आठवडा विशेष टीम―
सांगली जिल्ह्याला नदी पुररूज्जीवनासाठी तर अमरावती जिल्ह्यातील शरद पाणी वापर ठिबक सिंचन सहकारी सोसायटीला पहिला पुरस्कार मिळाला. याशिवाय नाशिक, जळगाव आणि बीड जिल्ह्यांनीही या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलसंधारण क्षेत्रात वैविध्यपूर्ण व उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाच्या कार्याचा गौरव म्हणून ‘राष्ट्रीय जल पुरस्कार 2019’ चे वितरण करण्यात आले. हे पुरस्कार 11 व 12 नोव्हेंबर असे दोन टप्यात उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांचे हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रदान करण्यात आले. यावेळी विविध 12 श्रेणींमध्ये एकूण 88 पुरस्कार प्रदान करण्यात आले यात महाराष्ट्राला एकूण 6 पुरस्कार मिळाले.
जलसंपत्ती नियमनात महाराष्ट्र देशात पुन्हा अग्रेसर
या कार्यक्रमात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात देशातील सर्वोत्कृष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्राधिकरणाचे सदस्य तथा जनसंवाद प्रमुख बॅरी. विनोद तिवारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
राज्यातील उपलब्ध जलसंपत्तीचे न्यायोचित, समन्यायी व टिकाऊ वितरण व व्यवस्थापन यासाठी ‘महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा, 2005’ अन्वये जलसंपत्ती नियमन प्राधिकरण स्थापन झालेले आहे. राज्यातील भू-पृष्ठावरील उपलब्ध जलसंपत्तीचे तसेच भू-जलाचे हे प्राधिकरण नियमन करते, प्राधिकरणाने स्वायत्तपणे जनहितार्थ घेतलेले निर्णय व त्यांच्या अंमलबजावणीने जलक्षेत्रात झालेला सकारात्मक परिणाम, अधिनियमाने विहित केलेल्या जबाबदाऱ्यांची अंमलबजावणी, पाण्याचा काटेकोर वापर, जल प्रदूषणावर नियंत्रण, सांडपाण्याचा पुनर्वापर यासाठी केलेली जनजागृती यांचा सर्वकष विचार करुन केंद्र शासनाने देशातील ‘सर्वोकृष्ट जल नियमन प्राधिकरण’ या संवर्गातील प्रथम पुरस्कारासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची सलग दुसऱ्यांदा निवड केली आहे.
नदी पुररूज्जीवनात सांगली जिल्हा देशात पहिला
नदी पुनरूज्जीवन श्रेणी मध्ये देशातील एकूण 6 विभागांमध्ये प्रत्येक विभागातील सर्वोत्तम तीन जिल्ह्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याला अग्रणी नदीच्या पुनरूज्जीवनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे उगम असलेली अग्रणी नदी दीडशे वर्षांपूर्वी वाहती होती. मात्र, मध्यंतरीच्या काही दशकांत ही नदी कोरडी होती व या नदीचे काही क्षेत्र लुप्त झाले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात पाणी साठे निर्माण करण्याच्या कार्यांतर्गत अग्रणी नदी पुनरुज्जीवनाचे कार्य हाती घेतले. जिल्हा प्रशासनाने खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्यातील 55 कि.मी. लांबीची अग्रणी नदी बारमाही करण्याच्या ध्यासाने कार्य केले. राज्य शासनाची योजना, जलबिरादरीसह सिंचन क्षेत्रात कार्यरत सेवाभावी स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने व लोकसहभागने वर्षानुवर्षे कोरड्या पडलेल्या नदीला पुनरुज्जीवन मिळाले. नदीच्या उगमापासून खोलीकरण आणि रूंदीकरणातून भव्य पात्र निर्माण झाले.
याशिवाय अमरावती जिल्ह्यातील शरद पाणी वापर ठिबक सिंचन सहकारी सोसायटीला सर्वोत्कृष्ट पाणी वापर संस्थेचा पहिला तर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील वाघाड प्रकल्पाला या श्रेणीमधे दुसऱ्या क्रमांकांचा पुरस्कार केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. शाह निमनीकरा सोहोमजी यांनी वाघाड प्रकल्पाच्या वतीने तर विजय देशमुख यांनी शरद पाणी वापर संस्थेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
जलसंधारणात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीना ही यावेळी सन्मानित करण्यात आले. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील अनोरे ग्रामपंचायतीने दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला. राज्यमंत्री श्री. कटारिया यांच्या हस्ते सरपंच तुकाराम पाटील यांच्यासह ग्राम पंचायत सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जलसंधारणात उत्कृष्ट कार्यासाठी देशातील काही व्यक्तींना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील अनिकेत लोहिया यांना पश्चिम विभागात जलयौध्दयाचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आम्हाला ट्विटरवर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
०००००
दयानंद कांबळे/ वि.वृ.क्र.102 / दि.12.11.2020