आठवडा विशेष टीम―
आरोग्य विभागाच्या १०८ या ‘टोल फ्री’ प्रमाणे मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेसाठी १९६२ हा ‘टोल फ्री’ क्रमांक प्रस्तावित
मुंबई, दि. १८ : पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी संनियंत्रणासाठी पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथे मध्यवर्ती कॉल सेंटरच्या स्थापनेसाठी इंडसइंड बँक यांची उपकंपनी असलेली भारत फायनांस इन्क्लुजन लिमिटेड या कंपनीसोबत मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली.
यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, सह सचिव माणिक गुट्टे, अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, भारत फायनान्स इन्क्लुजन लिमिटेड यांच्या वतीने श्रीनिवास रेड्डी वेदुमुला, हेड कोर्पोरेट सर्विसेस इंडसइंड बँक गीता थंडानी, प्रेमनाथ सिंग यांची उपस्थित होती.
पशुसंवर्धन मंत्री श्री. केदार म्हणाले, राज्यातील दुर्गम, डोंगराळ, आदिवासी बहुल भागामध्ये तसेच ज्या भागामध्ये पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या कमी आहे. दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा आहेत, अशा तालुक्यात पशुवैद्यकीय सेवा पशुपालकांच्या शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी, मुख्यमंत्री पशुस्वस्थ योजनेअंतर्गत राज्यातील ३४९ ग्रामीण तालुक्यांमध्ये फिरते पशुचिकित्सा पथक स्थापन करण्यात येणार आहेत. स्थापन करावयाच्या फिरत्या पशुचिकित्सा पथकांपैकी प्रथम टप्यात तालुक्यांमध्ये नवीन ८१ फिरती पशुचिकित्सा पथके स्थापन करण्यात येणार आहेत.
फिरते पशुचिकित्सा पथकांसाठी आधुनिक उपकरणांनी सुसज्ज ७३ वाहनांची खरेदी करण्यात आलेली आहे. तसेच फिरत्या पशुचिकित्सापथकांच्या कामांचा सर्वकष अभ्यास करून फलनिष्पती विचारात घेवून उर्वरित तालुक्यांमध्ये फिरते पशुचिकित्सापथके निर्माण करण्याचा निर्णय पुढील टप्यात घेण्यात येणार आहे. मध्यवर्ती कॉल सेंटरद्वारे फिरते पशुचिकित्सा वाहन व सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या पशुवैद्यकिय दवाखाने यांचा समन्वय ठेवून कमीतकमी वेळात पशुपालकांस दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.
राज्यातील पशुधनास कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया, वंध्यत्व तपासणी व गर्भधारणा तपासणी इत्यादी प्रकारच्या पशुआरोग्य सेवा पशुवैद्यकीय संस्थामार्फत नियमितपणे पुरविल्या जातात. तथापि पशुधन आजारी पडल्यास पशुधनास नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात घेवून जावे लागते. यासाठी पशुपालकांना वाहनाची सोय स्वखर्चाने करावी लागते. बहुतांश पशुपालकांना हा आर्थिक भार परवडणारा नसतो, त्यामुळे पशुवैद्यकीय सेवेअभावी पशुधनाचा मृत्यु होवून पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. राज्यातील पशुधनाची क्षमता वाढविण्यासाठी त्यांचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे व त्याकरिता उत्कृष्ट दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठी पशुवैद्यकीय सेवा पशुपालकांच्या दारापर्यंत पोहचविण्यासाठी फिरते पशुचिकित्सा पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.
भारत फायनांस इन्क्लुजन लिमिटेड या कंपनीद्वारे पशुसंवर्धन विभागाबरोबर सामंजस्य करार करुन त्यांच्या सीएसआर फंडातुन उपलब्ध होणाऱ्या निधीतून या सेंटरची कामे करण्यात येणार आहेत. भारत फायनांस इन्क्लुजन लिमिटेड ही कंपनी कॉल सेंटर कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक संगणक, विशेष सॉफ्टवेअर आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ पुरविणार असून पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांचे मार्फत औषधी व उपकरणांनी सुसज्ज फिरते पशुचिकित्सा वाहन, वाहन चालक व तज्ञ पशुवैद्यक उपलब्ध करून देणार आहे असे श्री. केदार यांनी यावेळी सांगितले.