आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण सदस्यपदी संजय कुलकर्णी यांचा शपथविधी झाला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी श्री. कुलकर्णी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
मंत्रालय येथे झालेल्या या छोटेखानी समारंभात जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सदस्य (अर्थव्यवस्था) डॉ. शिवाजी सांगळे, सदस्य (विधी) बॅ.विनोद तिवारी तसेच सचिव डॉ.रामनाथ सोनावणे उपस्थित होते.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणावर संजय देविदास कुलकर्णी, सदस्य (जलसंपदा) यांच्या नियुक्तीबाबतची अधिसूचना ६ नोव्हेंबर २०२० रोजी शासनाने प्रसिद्ध केली होती. त्यानुसार हा शपथविधी झाला. ही नियुक्ती पदावर रुजू झाल्याच्या दिनांकापासून ३ वर्षाच्या कालावधीसाठी किंवा त्यांच्या वयाची सत्तर वर्ष पूर्ण होईपर्यंत यापैकी जो दिनांक आधी येईल त्या दिनांकापर्यंत आहे.
सचिव डॉ. सोनावणे यांनी समारंभाच्या प्रारंभी नूतन सदस्यांचा परिचय देऊन प्रस्तावना केली. तसेच अधिसूचनेचे वाचनही केले. तद्नंतर जलसंपदा मंत्री यांनी श्री. कुलकर्णी यांना शपथ दिली.