चैत्यभूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. १८ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी येथे सुरु असलेल्या तयारीच्या नियोजनाचा तसेच इंदू मिल येथे उभे राहत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.

सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे यांनी डॉ. आंबेडकर स्मारक समितीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्मारकाच्या बांधकामासंदर्भात एम एम आर डी ए, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, स्मारकाचे काम करणारी कंपनी यांच्यासमवेत बैठक घेऊन आढावा घेत ही सर्व कामे दोन महिने अगोदर म्हणजेच मार्च 2023 पूर्वी झाले पाहिजे अशा सूचनाही दिल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मार्च 2023 मध्येच पूर्ण केले जाईल आणि त्याचा लोकार्पण सोहळा 14 एप्रिल 2023 रोजी केला जाईल, यासाठीची तयारी सुरू असल्याची माहिती श्री.मुंडे यांनी दिली. डॉ.आंबेडकर स्मारकाच्या दोन्ही तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून मुख्य प्रवेशद्वार सूचनेनंतर साडेसहा फुटावर नेण्यात आले आहे. इतर कामेही वेगात सुरु असल्याची माहितीही श्री. मुंडे यांनी दिली. स्मारक बांधकामाच्या सनियंत्रणाची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे असून, या कामाचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी विभागामार्फत सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे श्री.मुंडे यांनी सांगितले.

महापरिनिर्वाणदिनाच्या पार्श्वभूमीवर जनतेनी कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन चैत्यभूमी येथे गर्दी करू नये, असे आवाहनही श्री.मुंडे यांनी केले.

चैत्यभूमीच्या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण

चैत्यभूमी येथील कार्यक्रमाचे प्रमुख वाहिन्यांवरून तसेच विविध माध्यमांतून लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. नागरिकांना घरीच हा कार्यक्रम पाहता येईल अशी सोय करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका खर्च करणार असली तरी आवश्यकता पडल्यास सामाजिक न्याय विभागसुद्धा यासाठीचा निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.

महापरिनिर्वाणदिनाच्या दिवशी अनुयायांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाईव्ह सोहळ्याच्या माध्यमातून अभिवादन करावे, चैत्यभूमीवर प्रत्यक्ष येणे व गर्दी करणे टाळावे, असे आवाहनही श्री.धनंजय मुंडे यांनी केले आहे.

००००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.