आठवडा विशेष टीम―
महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभाग, युनिसेफ यांच्यावतीने राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहानिमित्त ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादातील चर्चेनंतर सहभागी संस्थांच्या वतीने डॉ. मृदुला फडके यांनी संयुक्त निवेदन सादर केले.
डॉ. मृदुला फडके म्हणाल्या, पाच वर्षाखालील बालकांचे तसेच मातांचे मृत्यू दर कमी करण्यात महाराष्ट्राने चांगली प्रगती केली आहे. सन 1997 ते 2016-18 या दरम्यान राज्यातील माता मृत्यू दर हा 166 वरून 46 एवढा खाली आला आहे. तर पाच वर्षाखालील बालकांचा मृत्यू दर हा सन 2007 ते 2018 दरम्यान 42 वरून 22 वर आला आहे. माता मृत्यू व बालक मृत्यू दर आणखी खाली आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी चांगल्या आरोग्य सुविधा, प्रसुती केंद्रातील सुविधांचा दर्जा राखणे, नवजात बालक केअर युनिटची सोय, सर्वच बालकांना समान सोयी आदींवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. प्रसुती खोलीत गर्भवती महिलेची व नवजात शिशुची योग्य ती काळजी घेतली जावी.
कोविड काळात गर्भवती महिला, नवजात बालके व मातांची योग्य काळजी घेण्यात यावी. सर्व आरोग्य विषयक यंत्रणांनी प्रसुतीच्या वेळी संरक्षणात्मक उपकरणे पुरवावीत तसेच शारीरिक अंतर राखणे, मुखपट्टी वापरणे, वारंवार हात धुणे, श्वसनसंबंधी स्वच्छता राखणे आदी काळजी सर्वच संबंधितांनी घ्यावी. यासाठी सामाजिक संस्था, आरोग्य विषयक काम करणारे व्यावसायिक व आरोग्य यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन या संयुक्त निवेदनात करण्यात आले आहे.
यावेळी डॉ. राजेश्वरी चव्हाण यांनी महिलांच्या विशेषतः गर्भवती महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे माता मृत्यू व बाल मृत्यू होत असल्याचे सांगितले. त्यासाठी महिलांनी ॲनिमिया दूर करून आरोग्याकडे लक्ष द्यावे. कोविड काळात महिलांमध्ये जनजागृतीसाठी आरोग्य विभाग, युनिसेफ यांच्या सहकार्याने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. केईएम हॉस्पिटलमध्ये सायकोसोशल सपोर्ट सेंटरच्या माध्यमातून नागरिकांचे मानसिक प्रबोधन करण्यात येत असल्याचे श्रीमती चव्हाण यांनी सांगितले.
गायनॅकोलॉजिस्ट असोसिएशनच्या डॉ. नंदिता पालशेतकर म्हणाल्या की, कोविड काळात माता व नवजात शिशुंची काळजी घ्यावी लागणार आहे. प्रधानमंत्री मातृत्व अभियानाच्या माध्यमातून खासगी डॉक्टरही प्रबोधन करत आहेत.
नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. एल.एस देशमुख म्हणाले, नवजात बालक मृत्यू दर कमी करण्यासाठी कांगाऊ मदर केअर संकल्पना राबविण्यात यावी. तसेच आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे. जेणेकरून बालक जन्मल्यानंतर पहिल्या काही तासात त्याची योग्य ती काळजी घेतली जाईल.
पेडियाट्रिशियन प्रा. प्रमोद जोग म्हणाले की, वेळेपूर्वीच बालकांचा जन्म, विषाणू संसर्ग यामुळेही बालमृत्यू होत आहेत. हे मृत्यू टाळण्यासाठी बालक व मातांमधील प्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर द्यायला हवा. डॉ. अपर्णा श्रोत्री यांनीही परिसंवादात सहभाग घेतला. युनिसेफच्या स्वाती मोहपात्रा व खणेंद्र भुयान यांनी परिसंवादाचे संचालन केले.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/18.11.2020