आठवडा विशेष टीम―
काल सुरगाणा तालुक्यातील श्रीभुवन लघुपाटबंधारे योजना पाहणी दौऱ्याप्रसंगी मंत्री श्री.पाटील बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, आमदार सुनील भुसारा, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, जलसंपदा विभागाचे सचिव तथा कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक टी. एन. मुंढे, मुख्य अभियंता अनंत मोरे, मुख्य अभियंता के. बी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, विजय घोगरे, कार्यकारी अभियंता योगेश सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, सुरगाणा तालुका हे सर्वाधिक पर्जन्यलाभ क्षेत्र असूनही येथील पाणी वाहून जाऊन पश्चिमेकडील समुद्रास मिळते. त्यामुळे स्थानिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलाचा प्रवास करावा लागतो. या ठिकाणी लघु पाटबंधारे सारख्या योजना केल्या तर स्थानिकांचा पाण्याचा प्रश्न तर सुटेलच त्यासोबत पाण्याची उपलब्धता होऊन नळपाणी पुरवठा सारख्या योजना सुद्धा या भागात सुरू करता येतील. स्थानिकांचा पाणीप्रश्न सुटल्यानंतर उर्वरित पाणी पश्चिमेकडे वळविता येईल. या कामासाठी पूर्णवेळ स्वतंत्र मुख्य अभियंता व संबंधित यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून देश कोरोनाच्या सावटाखाली असून आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येते आहे. लवकरच प्रलंबित असलेली विकास कामे सुद्धा आता सुरू करता येतील. पाण्याचे महत्त्व येथील स्थानिक शेतकऱ्यांना समजले असल्याने विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी त्यांनी स्वमालकीच्या जमिनी बंधारा बांधणीसाठी देऊन मोठे योगदान दिले आहे. ज्या शेतकऱ्यांनी स्वत:च्या जमिनी पाणी बंधाऱ्यासाठी दिल्या आहेत, त्यांचे पुनर्वसन करून जमिनीचा योग्य मोबदला त्यांना दिला जाईल, असेही जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले. पाणी बंधारा प्रकल्पासाठी स्वत:ची दहा एकर जमीन शासनास उपलब्ध करून देणारे शेतकरी श्री.रमेश सिताराम गवळी यांचा यथोचित सत्कारही यावेळी जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले, पाणी प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांचे जेवढे कौतुक व आभार व्यक्त करावे तेवढे कमीच आहे. तसेच या आदिवासी भागात लघु पाटबंधारे प्रकल्प सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न दूर होऊन खरीप हंगामानंतर उर्वरित आठ महिन्यांसाठी घाटमाथ्यावर रोजगारासाठी होणारी स्थानिकांची भटकंती थांबेल; तसेच सदर प्रकल्प जलदगतीने पूर्ण होऊन आदिवासी बांधवांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू होईल, असा विश्वासही विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ यांनी यावेळी व्यक्त केला.
यानंतर जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यातील घोडी प्रकल्प, दुमिपाडा, मांजरपाडा व धोंडाळपाडा या प्रस्तावित प्रकल्पांची पाहणी केली. तसेच देहरे प्रकल्पाचे भूमिपूजन आणि अंबाडा प्रकल्पाचे जलपूजन देखील केले.