उत्तर भारतीय व परप्रांतीय बांधवांनी छठपूजा उत्सव मार्गदर्शक सूचनांनुसार साजरा करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 19 : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा उत्तर भारतीयांचा छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

त्या अनुषंगाने शासनामार्फत पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्याचे पालन करावे, असे श्री.देशमुख यांनी म्हटले आहे.

मार्गदर्शक सूचना

१) कोरोनाचा संसर्ग वाढू नये यादृष्टीने नागरीकांनी तलाव, समुद्राकाठी एकत्रित न येता गर्दी टाळावी व घरीच थांबून साध्या पद्धतीनेच छठपूजा साजरी करावी.

२) महानगरपालिका, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता सुरक्षा व स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

3) छठपूजा उत्सवाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे मंडप उभारण्यात येऊ नयेत. तसेच कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. फटाक्यांची आतषबाजी व ध्वनीक्षेपणास बंदी असेल.

४) उत्तर भारतीय नागरीकांनी छठपूजेदरम्यान मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे तसेच ज्येष्ठ नागरीक व लहान मुलांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणू नये, यासंबंधी आयोजकांनी जनजागृती करावी.

५) छठपूजा कार्यक्रमाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

६) कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहीत केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवसाच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

००००

वि.सं.अ.-डॉ.राजू पाटोदकर

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.