आठवडा विशेष टीम―
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात दिवंगत इंदिराजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव संजय कुमार, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे, उपसचिव ज. जी. वळवी आदी मान्यवरांसह शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांसह सर्व उपस्थितांनी यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त देशाचे स्वातंत्र्य व राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी तसेच ती अधिक दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक कार्य करण्याची शपथ घेतली. आपापसातील सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणी शांततामय व संवैधानिक मार्गाने सोडवण्याचे प्रयत्न करण्याची शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, श्रीमती इंदिराजींनी देशाची स्वतंत्रता, एकता, अखंडता, सार्वभौमता टिकवण्यासाठी जीवनभर कार्य केले. त्यासाठी प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या कार्याचे व बलिदानाचे स्मरण करत असतानाच आपापसातील वाद, मतभेद शांततेच्या मार्गाने मिटवण्याचा व संपूर्ण देश हिंसाचारमुक्त करण्यात आपलेही योगदान असले पाहिजे. इंदिरा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाचे तसेच स्वातंत्र्योत्तर काळात पंतप्रधान म्हणून केलेल्या कार्याचेही त्यांनी स्मरण केले. बांगलादेशची निर्मिती, बँकाचे राष्ट्रीयकरण, अलिप्त राष्ट्र शिखर परिषदेचे नेतृत्व करताना इंदिराजींनी बजावलेल्या भूमिकेचे स्मरण करून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
००००