आठवडा विशेष टीम―
नाशिक, दि. 20 : आधारभूत हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदीचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. शेतकऱ्यांना या केंद्राजवळ लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा देखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.
पेठ तालुक्यातील करंजळी येथे आधारभूत हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवळ बोलत होते. यावेळी महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक तथा आमदार सुनील भुसारा, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित, आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जयराम राठोड, उपव्यवस्थापक रोहित बनसोडे, तहसीलदार संदीप भोसले आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
विधानसभा उपाध्यक्ष श्री.झिरवाळ म्हणाले, शेतकरी शेतात अन्न धान्य पिकवतो, त्या शेतमालाला मिळणाऱ्या भावाला चढ उतार असतात; परिणामी शेतकऱ्याचे नुकसान देखील होण्याची शक्यता असते. मात्र, आधारभूत हमीभावामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव तर मिळणारच आहे; पण त्यासोबत शेतमालाची विक्री करून मिळणारे पैसे संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. महामंडळ आधारभूत हमीभावापेक्षा कमी दराने धान खरेदी करणार नाही तसेच शेतकऱ्यांनीही इतर व्यापाऱ्यांना विक्री करताना हमीभावपेक्षा कमी दराने विकू नये; म्हणजे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असताना आदिवासी विकास महामंडळाला पुन्हा ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भात गिरण्यांचा प्रश्न नेहमीच उपस्थित होत आहे. त्यासाठी सहकार विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, पेठ तालुक्यातील सहकारी सोसायट्या तसेच या संबंधित असलेल्या संस्था यांसोबत चर्चा करून वरिष्ठ स्तरावर निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.
कोरोनामुळे विकासकामांची गती कमी झाली; मात्र राज्य शासन आता हळूहळू सर्वच स्तरावर विकासकामे सुरू करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जरी झालेला असला तरी देखील पूर्णतः नायनाट झालेला नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा प्रशासन यंत्रणा त्यादृष्टीने पूर्णतः तयारीत असल्याचेही श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
0000000