हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. २४ : कोरोना संकटाच्या या काळात संपूर्ण जगात वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित झाले असून सद्यस्थितीत डॉक्टरांचे काम सर्वात कठीण तर आहेच त्याचबरोबर चांगले डॉक्टर निर्माण करणे ही सुद्धा काळाची गरज आहे. ही गरज लक्षात घेता महाराष्ट्रातील दुर्गम भागात वैद्यकीय शिक्षण संबंधित पायाभूत सुविधा, महाविद्यालये व रुग्णालये विकसित करण्यास महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले. या अनुषंगाने हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हिंगोली येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील बैठक मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, खासदार राजीव सातव, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

hingoli dist meeting 1

श्री. देशमुख म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी ही जागा योग्य आहे का याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत पुढील आठवड्यात पाहणी करण्यात येईल. तसेच हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी पशुसंवर्धन विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाला जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया होणे आवश्यक आहे. जागा हस्तांतरीत झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय उभारणीबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. सिंधुदुर्ग, गोंदिया आणि नंदुरबार येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत सध्या कार्यवाही सुरु असून हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामालाही गती देण्यात येईल.

नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी किमान सलग 20 एकर जागा आवश्यक आहे. तसेच किमान 300 रुग्णखाटांचे रुग्णालय नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असणे आवश्यक आहे. यामुळेच वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत हिंगोली येथील महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या जागेची पाहणी आणि याबाबतचा अहवाल तयार करण्याच्या कामाला गती देण्यात येईल, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.