पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक पूर्वतयारीचा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी घेतला आढावा

आठवडा विशेष टीम―

पुणे, दि. २५ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेवून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडा, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिल्या.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांच्या निवडणूक विषयक पूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड, पुणे, कोल्हापूर, सांगली, साताराचे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे डॉ. राजेश देशमुख, दौलत देसाई, डॉ. अभिजित चौधरी, शेखर सिंग, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पुण्याचे सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, उपायुक्त तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण, सोलापूर चे अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्यासह निवडणूक यंत्रणेशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे विभागाच्या निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेवून मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीअंतर्गत मतदान व मतमोजणीसाठीची तयारी वेळेत पूर्ण करा. निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन करा. तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. बोगस मतदान होवू नये, यासाठी सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. मतदान केंद्रावर पडताळणी दरम्यान बोगस मतदार असल्याचे निष्पन्न झाल्यास गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी, असे सांगून श्री. सिंग म्हणाले, निवडणूकीचे कामकाज शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडाव्यात. योग्य नियोजन करुन समन्वयाने कामे वेळेत पूर्ण करावीत.

श्री. सिंग म्हणाले, कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करुन घ्या. मतदानासाठीच्या रांगेत सामाजिक अंतर राखले जाईल, यासाठी नियोजन करा. केंद्राच्या ठिकाणी हँड वॉश, सॅनिटायझर, साबण, हॅन्ड ग्लोव्हज, व अन्य आवश्यक साहित्य गरजेनुसार वेळेत पुरवले जाईल, याची दक्षता घ्या. मतपत्रिका व मतदानाचे साहित्य वेळेत संबंधितांच्या ताब्यात द्या, असे सांगून निवडणूक विषयी पूर्ण झालेली कामे व उर्वरित कामकाजाचा श्री. सिंग यांनी आढावा घेतला.

विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव म्हणाले, पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्याबाबत विविध माध्यमांद्वारे जनजागृती केली जात आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मतदान केंद्राचे सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. तसेच यादृष्टीने आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे सांगून श्री. राव यांनी एकूण मतदार, मतदान केंद्रे, कर्मचारी व्यवस्थापन, विविध पथके व कक्षांचे कामकाज तसेच निवडणूकीच्या अनुषंगाने पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पाचही जिल्ह्यात झालेल्या पूर्व तयारीबाबत व कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश व सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.