आठवडा विशेष टीम―
श्री. बनसोडे म्हणाले, येणारा ६ डिसेंबर हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. समाजाप्रती त्यांचे कार्य आणि समर्पणाला वंदन करण्यासाठी देशभरातून अनुयायी आस्थेने येत असतात. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आम्हा साऱ्यांचे आदर्श असून आम्हीही त्यांचे अनुयायी आहोत. समाजात समानता प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांनी आजीवन संघर्ष केला. अन्यायाविरुद्ध बंड पुकारले. त्याचबरोबर भारताचे संविधान निर्माण करून देशाला कायदे, अटी, नियम, आचारसंहिता घालून दिल्या. असे असताना ज्या महामानवाने संविधान निर्माण केले त्यांच्या अभिवादनाच्या कार्यक्रमात जनतेचा जीव धोक्यात घालणे अनुचित ठरेल. म्हणूनच, ही वेळ आहे आपल्या आचरणातून एक सुजाण नागरिक असल्याची प्रगल्भता दाखविण्याची. आजही कोविडचा धोका आहे, तो नष्ट झाला असे मानणे चूक आहे.
चैत्यभूमीवर गर्दी न करता डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ज्या-ज्या काही गोष्टी करायच्या त्या सर्व केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमतरता येऊ दिली जाणार नाही. यापूर्वीही आपण सर्व सणवार साधेपणाने साजरे केले आहेत. डॉ.बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण हा गांभीर्याने आणि अभिवादन करण्याचा प्रसंग आहे. त्यामुळे या कठीण काळात आपण जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करा,असे आवाहन श्री. बनसोडे यांनी केले आहे.