यूपीएससी मुख्य परीक्षेस पात्र अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ‘बार्टी’मार्फत मूळ नियमावली प्रमाणेच लाभ द्या – मुंडे

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 25 : केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 साठी पात्र असलेल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या एकरकमी अर्थसहाय्य योजनेसाठी बार्टीमार्फत मागील वर्षीच्या मूळ नियमावलीप्रमाणेच लाभ देण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री तथा बीड चे पालकमंत्री डि.पी.मुंडे यांनी दिले आहेत.

यूपीएससी मुख्य परीक्षेस पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्यामार्फत एकरकमी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. यासाठी बार्टीमार्फत अर्ज मागविण्यात आले होते. परंतु अर्ज करताना बार्टीमार्फत त्यांच्या स्तरावर विविध नियमावली तयार करून ती जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती.

यातील इतर योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना एकरकमी अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेता येणार नसल्याच्या अटीसह अन्य चार ते पाच अटी जाचक असल्याच्या अनेक विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे तक्रारी केल्या होत्या.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री मुंडे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या अटी तातडीने रद्द करून मागील वर्षी २०१९ मध्ये ज्या नियमावलीनुसार या योजनेचा लाभ दिला होता, त्यानुसारच लाभ देण्यात यावा अशा सूचना बार्टीच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याने, पात्र विद्यार्थ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.