आठवडा विशेष टीम―
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभरात दि. 1 जानेवारी, 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार दिनांक 17 नोव्हेंबर, 2020 रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून प्रारुप मतदार यादीतील नोंदीबाबत दावे व हरकती दि. 15 डिसेंबर, 2020 पर्यंत स्वीकारण्यात येतील. ज्या पात्र मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीत समाविष्ट नाहीत अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करावयाच्या असल्यास अशा मतदारांनी संबंधित बाबीसाठीच्या विहित नमुन्यामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.
सर्व राज्यभरात या पुनरिक्षण कार्यक्रम कालावधीत शनिवार दि. 5 डिसेंबर तसेच रविवार दि. 6, शनिवार दि. 12 आणि रविवार दि. 13 डिसेंबर, 2020 रोजी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरिता त्याच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (बूथ लेव्हल एजन्ट- बीएलए) नेमणूक करावी आणि शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बूथ लेव्हल ऑफीसर- बीएलओ) मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे.
भारत निवडणूक आयोगाद्वारे www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची आणि यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली असून या सुविधेचाही उपयोग करावा. अधिक माहितीसाठी wwww.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.