सुरक्षित, निर्भेळ आणि आरोग्यदायी अन्न पुरविण्यासाठी ‘फूड सेफ्टी मिशन’ ही विशेष मोहीम

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 25 : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला सुरक्षित, निर्भेळ आणि आरोग्यदायी अन्न मिळावे यासाठी अन्न सुरक्षा अंकेक्षण (फूड सेफ्टी ऑडिट) करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. या संदर्भात त्यांनी बुधवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती.

कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या जातात त्यात, हात धुणे, सामाजिक अंतर राखणे या बरोबरच स्वच्छ आणि व्यवस्थित शिजवलेले अन्न खाणे यावरही भर दिला जातो. लॉकडाऊननंतर आता हॉटेल्स, आणि बाहेरील खाद्य पदार्थ विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. शिंगणे यांनी ही मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत.

मानकांची पूर्तता करा आणि प्रमाणपत्र घ्या

अन्न पदार्थ पुरवणाऱ्या व तयार करणाऱ्या आस्थापनांनी त्यांना दिलेल्या निकषांची पूर्तता करावी आणि केंद्र शासनाच्या फूड सेफ्टी ॲण्ड स्टॅण्डर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) यांनी अधिकृत मान्यता दिलेल्या 26 अंकेक्षण संस्थांमार्फत (ऑडिट एजन्सी) ऑडिट करुन घ्यावे. आस्थापनानी अशा प्रकारे थर्ड पार्टी ऑडिट झाल्यानंतर या मानकांची पूर्तता करणाऱ्या आस्थापनांनी मानकांची समाधानकारक पूर्तता केली असेल तर या ऑडिट संस्थांमार्फत अन्न तयार करणाऱ्या आस्थापनांना प्रमाणपत्र दिले जाईल. यामुळे ग्राहकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न पदार्थ पुरविले जाण्याची हमी मिळणार आहे.

हॉटेल व्यवसायिकांना मिळेल हायजिन रेटिंग

अन्न बनवणाऱ्या आस्थापना विविध ॲपच्या माध्यमातून अन्न ग्राहकांपर्यंत पोहचवित असतात. अन्न पदार्थांच्या दर्जानुसार त्यांना ए- बी-सी असे ग्रेडिंग ग्राहक देतात. ए ग्रेड व्यतिरिक्त बी सी अशा ग्रेड असलेल्या हॉटेलमधून अन्न घेणे ग्राहक टाळतात. अंतर्गत व्यावसायिक स्पर्धेमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये स्वच्छ, सुरक्षित, आरोग्यदायी वातावरण राखण्यास स्पर्धा निर्माण होते. याच धर्तीवर या 26 ऑडिट संस्थांमार्फत हायजिन रेटिंग घेण्याची कार्यवाही हाती घेण्यात येईल जेणेकरून अन्नपदार्थ पुरविणाऱ्या आस्थापनांमध्ये चढाओढ निर्माण होऊन ग्राहकांना सुरक्षित अन्न पदार्थ मिळू शकतील. याचबरोबर ग्राहकांचा फिडबॅक घेण्यासाठी आणि ग्राहकांनाही रेटिंग देता यावे यासाठी विशेष ॲप तयार करण्यात यावे, असे निर्देश डॉ. शिंगणे यांनी दिले आहेत.

राज्यात सध्या 19,474 अन्न प्रक्रिया घटक कार्यरत असून 6,136 कॅटरर्स, 39,490 हॉटेल्स आणि रेस्टॉरंट, 3,165 डेअरी प्रक्रीया, 62 कत्तलखाने आणि 2,341 अन्न साठवणूक केंद्रे आहेत. या सर्वांना अन्न सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत नागरिकांना सुरक्षित व आरोग्यदायी अन्न पदार्थ पुरविण्याची हमी देणे बंधनकारक आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.