आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेने मदत करा –राधाकृष्ण गमे

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

जळगाव, दि. २५– कुटूंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण कुटूंब असह्य होते. विशेषत: शेतकरी बांधवांच्या कुटूंबियांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी या कुटूंबांच्या ‘उभारी’ साठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने काम करणे आवश्यक आहे. यासाठी महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सामाजिक संस्थांनी स्वयंस्फुर्तीने प्रयत्न करावेत. असे आवाहन नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.

आयुक्त श्री. गमे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते येथील जिल्हा नियोजन सभागृहात जळगाव जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना विविध सामाजिक संस्थाच्यावतीन ‘उभारी’ या कार्यक्रमांतर्गत खाजगी क्षेत्रात नोकरी, शिलाई मशीन, पिठाची गिरणी, बियाणे, खते, किटकनाशकांचे वितरण करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंडे, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, कैलास कडलग, राजेंद्र कचरे, लक्ष्मीकांत साताळकर, विनय गोसावी, सीमा अहिरे, रामसिंग सुलाणे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, राजेंद्र वाघ, तुकाराम हुलवळे यांचेसह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

आयुक्त श्री. गमे म्हणाले, आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपुष्टात येत असली, तरी सामाजिक जबाबदारी कायम राहते. या भावनेतूनच ‘उभारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अशा कुटुंबांच्या पाठिशी प्रशासन आहे ही भावना रुजवायची आहे. या उपक्रमातंर्गत जळगाव जिल्ह्यात अतिशय चांगले काम सुरु आहे. यापुढेही अधिकारी, कर्मचारी यांनी दर तीन महिन्यांना या कुटूंबांना भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवाव्यात. या उपक्रमांतर्गत वेगवेगळया पध्दतीने मदत करता येते हे जळगाव जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संस्थांनी दाखवून दिल्याचे गौरोवोद्वगारही त्यांनी यावेळी काढले.

जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले, जळगाव जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. ते आगामी काळातही त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करतील. त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. त्याचबरोबर त्या कुटूंबातील सदस्यांच्या शिक्षणानुसार त्यांना रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील.

उपविभागीय अधिकारी श्री. राजेंद्र कचरे म्हणाले, जळगाव जिल्ह्यात ‘उभारी’ हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांत आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. या कुटुंबातील काही सदस्यांना आज विविध वस्तुंचे वाटप करण्यात येत आहे. पाचोरा तालुक्यातील कुटूंबातील सदस्यांना निर्मल सिड्स येथे नोकरी देण्यासाठी व्यवस्थापनाने तातडीची बैठक घेऊन ठराव केला तर गजानन उद्योग समुह यांनीही नोकरीचे नियुक्ती पत्र दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबद्दल विभागीय आयुक्तांनी श्री. कचरे यांचे विशेष कौतूक केले.

या कुटूंबियांना निर्मल सिड्स प्रा. लि. पाचोरा, गजानन उद्योग समुह, पाचोरा, हाजी जाकिरखान कुरेशी, भडगाव, रोटरी क्लब, जळगाव, मंगळग्रह संस्था, अमळनेर लायन्स क्लब, अमळनेर, तलाठी संघटना, चोपडा, पोरवाल कृषि सेवा केंद्र, तालुका कृषि अधिकारी, धरणगाव यांच्यावतीने खाजगी क्षेत्रात नोकरी, शिलाई मशीन, पिठाची गिरणी, बियाणे, खते, किटकनाशकांचे वितरण केले. याबद्दल डिगंबर महाले, भावेश शहा, विनोद भोईटे, वर्धमान भंडारी, हितेश्वर मोतिरामाणी यांच्यासह कृषि विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या विभागीय आयुक्त यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

उभारी कार्यक्रमाअंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील खालील व्यक्तींना विविध वस्तुंचे वाटप करण्यात आले. शुभांगी सोनूसिंग पाटील यांना निर्मल सिड्स प्रा. लि. पाचोरा येथे सिड्स ॲसीस्टंट म्हणून नोकरी, पाचोरा येथील सागर संजय पाटील यांना गजानन उद्योग समुह, पाचोरा यांच्याकडून खाजगी क्षेत्रात नोकरी, कल्पना विजय पाटील यांना हाजी जाकिरखान कुरेशी, भडगाव यांच्याकडून शिलाई मशीन व पिको फॉल मशीन, जळगाव येथील सुनिता मिठाराम पाटील, सीमा आबासाहेब काळे, पारोळा येथील कल्पना दिपक पाटील यांना रोटरी क्लब जळगाव यांच्याकडून शिलाई मशीन, अमळनेर येथील रत्नाबाई सुदाम पाटील, संगिता निंबा पाटील, संगिता वाल्मीक पाटील, छाया दत्तात्रय पाटील यांना डिगंबर उर्फ राजु महाले,अध्यक्ष, मंगळग्रह संस्था अमळनेर व लायन्स क्लब, अमळनेर यांच्याकडून शिलाई मशीन, चोपडा येथील सुरेखा नितीन पाटील, मंगलाबाई वासुदेव माळी, अश्वीनी अविनाश पाटील, विजया संतोष पाटील, आशाबाई संजय पाटील यांना लोकसहभाग तहसिल कार्यालय, चोपडा येथील अधिकारी व कर्मचारी व तलाठी संघटना यांच्याकडून शिलाई मशीन, अमळनेर येथील रेखा संजय पाटील, उषा भागवान पाटील, सुनिता यशवंत पाटील, ललीता अर्जून पाटील यांना डिगंबर उर्फ राजु महाले, अध्यक्ष, मंगळग्रह संस्था, अमळनेर व लायन्स क्लब, अमळनेर यांच्याकडून पिठाची छोटी गिरणी, जळगाव येथील विजय पुंडलिक पाटील व रमेश देवराम पाटील यांना कृषि विभाग व पोरवाल कृषि सेवा केंद्र यांच्या कडून बियाणे व खते, धरणगाव येथील पुष्पाबाई पाटील, हिरकनबाई पाटील, सारिका कोळी यांना तालुका कृषि अधिकारी, धरणगाव यांच्याकडून बी बियाणे, खते व किटकनाशकांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.