आचारसंहितेचे पालन करत निवडणूक प्रक्रिया सतर्कतेने पार पाडा

आठवडा विशेष टीम―

औरंगाबाद: पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत आचारसंहितेचे पालन करत कोविडच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेने सर्व उपाययोजना सज्ज ठेवून निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देश प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज येथे दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज औरंगाबाद विभागातील आठही जिल्ह्यांच्या निवडणूकविषयक पूर्वतयारीचा आढावा प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील केंद्रेकर, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना, औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जालन्याचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, हिंगोलीचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, लातूरचे जिल्हाधिकारी. जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील,पोलीस उपायुक्त मिना मकवाना आदींसह विभागातील सर्व पोलीस अधीक्षक व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे उपस्थित होते.

यावेळी श्री. सिंह यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांनूसार सर्व निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडावी. प्रामुख्याने सर्व मतदान केंद्रांवर कोविडच्या पार्श्वभूमीवर पूरक व्यवस्था ठेवत सामाजिक अंतर राखून मतदान प्रक्रिया पार पाडण्यावर कटाक्षाने लक्ष द्यावे. यामध्ये पुरेशा प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाययोजना, आरोग्य पथक सज्ज ठेवावेत, असे निर्देशित करून सर्व केंद्रावर सॅनिटायजर, गर्दीस प्रतिबंध आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याच्या सूचना श्री. सिंग यांनी संबंधितांना दिल्या. तसेच सर्व मतदारांना सॅनिटायजर देऊन मगच मतदान केंद्रात प्रवेश देण्यात यावा. सर्व मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. त्याचप्रमाणे मतदान, मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार, नियमबाह्य गोष्टी घडणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी. आक्षेपार्ह काही घडल्यास अशा प्रकारच्या घटनेची तातडीने आयोगास माहिती द्यावी. नकारात्मक गोष्टी प्रसारित होणार नाही, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी घडणार नाही, यासाठी यंत्रणांनी खबरदारी घेण्याचे निर्देश श्री. सिंह यांनी यावेळी दिले. मतदान प्रक्रियेबाबत मतदारांना पुरेशी माहिती यंत्रणांनी देऊन जनजागृती करावी. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसेच मतदान प्रक्रिया सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही श्री. सिंह यांनी यावेळी दिल्या.

विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील केंद्रेकर म्हणाले, औरंगाबाद विभागातील आठही जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्याबाबात विविध माध्यमांद्वारे जनजागृती केली जात आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मतदान केंद्राचे सॅनिटायझेशन करण्यात येणार असून यादृष्टीने आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे सांगून श्री. केंद्रेकर म्हणाले की, औरंगाबाद विभागात एकुण 3 लाख 73 हजार 166 पदवीधर मतदार असून त्यात पुरूष पदवीधर मतदार 2 लाख 86 हजार 249 तर महिला पदवीधर 86 हजार 909 आहे. तर सर्वाधिक एकुण पदवीधर मतदार संख्या ही औरंगाबाद जिल्ह्याची असून 1 लाख 63 हजार 79, जालना-29 हजार 765, परभणी- 32 हजार 715, हिंगोली-16 हजार 794, नांदेड-49 हजार 285, बीड-63 हजार 436, लातूर- 41 हजार 190, उस्मानाबाद-33 हजार 632 इतकी आहे. औरंगाबााद विभागात एकुण 813 मतदान केंद्र आहेत. त्यात औरंगाबाद-206, जालना-74, परभणी-78, हिंगोली-39, नांदेड-123, लातूर-88, उस्मानाबाद-74, बीड-131 मतदान केंद्र आहेत. औरंगाबाद विभागात एकूण 937 सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली असल्याचे सांगून श्री. केंद्रेकर यांनी अधिकारी-कर्मचारी व्यवस्थापन, विविध पथके, कक्षाचे कामकाज तसेच मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने औरंगाबाद विभागातील आठही जिल्ह्यात झालेल्या पूर्वतयारीबाबत व कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना यांच्यासह सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हानिहाय करण्यात आलेल्या कायदा व सुव्यवस्था नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.

मतमोजणी प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 ची मतमोजणी प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पाडण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज अधिकारी, कर्मचारी यांना दिल्या.

चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. येथे आयोजित मतमोजणी प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. केंद्रेकर बोलत होत. यावेळी निवडणूक निरीक्षक बी. वेणूगोपाल रेड्डी, मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, उपायुक्त, अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी श्री. केंद्रेकर म्हणाले, मतमोजणी प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे अचूकपणे मतमोजणी प्रक्रियेत पालन करावे. मतमोजणी प्रक्रियेत अचूकता, गती याचा विचार करावा. प्रशिक्षणात शंकांचे निरसन करून घ्यावे. निवडणूकसंबंधी सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रत्येकाने गांभीर्यपूर्वक व अचूकरित्या पार पाडून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

प्रशिक्षणात पुनर्वसन उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी यांनी मतमोजणी प्रक्रिया : कार्यक्रम पत्रिका, कामनिहाय विभागणी व नियुक्त अधिकारी यांची कर्तव्ये, मतमोजणी प्रक्रिया वैध, अवैध मतपत्रिका संबंधी तरतुदी, त्यांची उदाहरणे, मतमोजणी प्रक्रिया, मतमोजणीची दुसरी व त्यापुढील फेऱ्यांसंबंधी कायदेशीर तरतुदी, मतमोजणी प्रक्रिया नि:शेषीत (एक्जॉहस्टेड) मतपत्रिकेची उदाहरणे याबाबत सविस्तर माहितीचे सादरीकरण केले.

चित्रफितीचे निवडणूक निरीक्षकांकडून कौतु

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम यांच्या संकल्पनेतून निवेदिका, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्या वतीने ‘डमी मतमोजणी केंद्रातील मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात तयार करण्यात आलेली चित्रफित’ प्रशिक्षणात दाखविण्यात आली. या चित्रफित निर्मितीसाठी महसूल उपायुक्त पराग सोमण, पुनर्वसन उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी आणि अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. पदवीधर निवडणूक मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात तयार करण्यात आलेल्या या चित्रफितेचे कौतुक निवडणूक निरीक्षक बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी केले. चित्रफित निर्मितीत यंत्रणेतील सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांचाही सहभाग आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.