आठवडा विशेष टीम―
मुंबई विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठांमध्ये लोककलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्यासाठी लोककला अकादमी या विभागासाठी शिक्षकीय व शिक्षकेतर पदे मंजूर करण्याबाबत गुरूवारी विधानभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, उपकुलसचिव डॉ. अशोक फर्डे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. युवराज मलघे, शिक्षण विभागाचे अवर सचिव वि. अ. धोत्रे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव वि. ए. साबळे, लोककला अकादमीचे प्रमुख डॉ.गणेश चंदनशिवे, प्राध्यापक डॉ. प्रकाश खांडगे आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
उपाध्यक्ष श्री. झिरवाळ म्हणाले, भारतामध्ये लोककला शास्त्रशुद्ध पद्धतीने केवळ मुंबई विद्यापीठात शिकविले जाते. आदिवासी लोककला आणि पारंपरिक गायन, नृत्य आणि वादकाचे शिक्षण दिल्याने लोककला जोपासल्या जात आहेत व त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे हे महत्त्वाचे साधन आहे. शिक्षक निवडीसाठीचे नियम व अटी कला शिक्षकाच्या निवडीसाठी लागू करता येत नाही. याकरिता विशेष बाब म्हणून या लोककला शिक्षकांच्या नेमणुकीचा सकारात्मक प्रस्ताव सादर करून त्यावर कालमर्यादेत कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असेही श्री. झिरवाळ यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. याचबरोबर पठ्ठे बापूराव कला अकादमीच्या प्रस्तावावरही सकारात्मकरित्या कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली.
०००