आठवडा विशेष टीम―मुंबई, दि. २६ : मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राणपणाने लढताना मृत्युमुखी पडलेल्या जवानांचे बलिदान सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी असेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, मी सर्वप्रथम आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांना तसेच त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा नमन करतो. बलिदान ही देशाच्याप्रती एक भावना असते. प्रत्येकाची एक आई असते, त्याचप्रमाणे भारतमाता, अदृश्य माता या तीन माता प्रत्येक जवानांना शक्ती देत असतात.
जे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता देशासाठी प्राणार्पण करतात ते अमर होतात. आणि हेच जवान आपल्या जीवाची पर्वा न करता आपले रक्षण करतात. त्याचप्रमाणे त्यांनी मुंबई आणि देशाचे रक्षण करून मोठे कार्य केले आहे. हे शहीद जवान वंदनीय व पूजनीय आहेत. या शहीद जवानांचे पाल्य आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करुन राज्यपालांनी शहीदांच्या कुटुंबियास पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
२६/११ हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी मुंबईवर हल्ला होऊन आपले जवान शहीद झाले त्या दिवसापासून आपण हा दिवस शहीद दिन म्हणून पाळतो.
२६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी प्राणपणाने लढताना मृत्युमुखी पडलेल्या शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहून शहीद अशोक मारुतीराव कामटे, विजय सहदेव साळसकर, प्रकाश पांडुरंग मोरे, बाबुराव साहेबराव धुरगुडे, बाळासाहेब चंद्रकात भोसले, तुकाराम गोपाळ ओंबळे, जयवंत हनुमंत पाटील, विजय मधुकर खाडेकर, अरुण रघुनाथ चित्ते, योगेश शिवाजी पाटील, अंबादास रामचंद्र पवार, शशांक चंद्रसेन शिंदे, मुरलीधर लक्ष्मण चौधरी, राहुल सुभाष शिंदे, नितेश भिकाजी जाधव यांच्या कुटुंबियांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते लॅपटॉप व सन्मान चिन्ह देऊन कृतज्ञतापूर्व सन्मान करण्यात आला.