वन स्टॉप सेंटर हक्काच्या जागेत कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न करा – यशोमती ठाकूर

आठवडा विशेष टीम―

जळगाव दि. 27 – पीडित महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत वन स्टॉप सेंटर सुरु करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात या सेंटरच्या बांधकामासाठी प्रशासनाने जागा उपलब्ध करुन दिली आहे. सदर सेंटरच्या बांधकामासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळवून बांधकाम लवकरात लवकर सुरु होईल यासाठी प्रयतन करावेत. अशा सुचना राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंत्री ॲङ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली कोविड आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस बैठकीस आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंडे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार, विभागीय उपायुक्त चंद्रकांत पगारे, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, ॲड संदिप पाटील यांचेसह नोडल अधिकारी उपस्थित होते.

मंत्री ॲड ठाकूर पुढे म्हणाल्या की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने आवश्यक ते नियोजन करावे. शाळा सुरु झाल्यानंतर मुलांची सुरक्षितता जपण्याच्या सुचनांही त्यांनी दिल्यात. त्याचबरोबर पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. यासाठी सोनोग्राफी सेंटरच्या तपासण्या वाढविल्या पाहिजेत. महिला व बाल हक्क संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. महिलांवर अत्याचार होणार नाही यासाठी त्यांच्या संरक्षण व सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. सायबर क्राईममुळे फसवणुक झालेल्या महिलांना न्याय मिळवून द्यावा. खाजगी आस्थापनेत बाल कामगार ठेवले जाणार नाही याची काळजी घ्यावी, महिलांच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा, महिला व बाल विकास आणि पोलीस विभागाने महिलांचे समुपदेशन करावे. याकरीता जिल्ह्यातील वन स्टॉप सेंटरद्वारे अधिक प्रभावीपणे काम होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी महिला व बाल विकास विभागाच्या उपक्रमांना सर्वातोपरी सहकार्य करण्यात येत असल्याचे सांगितले यासाठी दरमहा आढावा बैठक घेण्यात येते. महिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पोलीस विभागामार्फत‍ स्वतंत्र पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मुंडे यांनी दिली. तर अधिष्ठाता डॉ. रामानंद व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी कोरोनाची सद्य:परिस्थिती याबाबतची माहिती बैठकीत दिली.

बैठकीच्या सुरुवातीस श्रीनगर येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश देशमुख यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.