अमरावती: मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सुसज्ज – निवडणूक निर्णय अधिकारी

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

अमरावती, दि. २७ : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी एकूण 963 अधिकारी व कर्मचारी यांचे मनुष्यबळ सुसज्ज ठेवण्यात आले आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज येथे सांगितले.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे आदी उपस्थित होते. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला सकाळी 8 ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी 27 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांची संख्या 35 हजार 622 असून, त्यात 26 हजार 60 पुरूष आणि 9 हजार 562 महिलांचा समावेश आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंह म्हणाले की,  मतदानासाठी विभागात 77 मतदान पथकांबरोबरच प्रत्येक जिल्ह्यासाठी तीन याप्रमाणे 15 राखीव पथके तयार करण्यात आली आहेत. एकूण 963 मनुष्यबळात 27 झोनल अधिकारी, 77 मतदान केंद्राध्यक्ष, 231 मतदान अधिकारी, 154 पोलीस कर्मचारी,  92 सूक्ष्म निरीक्षक, 231 आरोग्य कर्मचारी, 92 चतुर्थश्रेणी कर्मचारी यांचा समावेश आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर कोविड-19 च्या सुरक्षात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक समुदाय आरोग्य अधिकारी व दोन सहायक असे आरोग्य पथक नेमण्यात आले आहे. मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदार किंवा मतदान पथकातील अधिकारी- कर्मचा-यात कोविडसदृश लक्षणे आढळल्यास त्याचे विलगीकरण करून उपचारासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू राहील.

मतपत्रिकांची छपाई पूर्ण

मतपत्रिका गुलाबी रंगाची आहे. एकूण 42 हजार 600 मतपत्रिका व 300 टपाली मतपत्रिका छापण्यात आल्या आहेत. त्यात दोन मतपत्रिका अनुक्रमांक मुद्रित न झाल्याने, तसेच तीन मतपत्रिका फाटलेल्या असल्याचे आढळल्या. अशा एकूण पाच मतपत्रिका रद्द करण्यात आल्या. त्याबाबतची माहिती सूचनाफलकावर प्रसिद्ध करून त्याची प्रत सर्व उमेदवार व मतदान केंद्राध्यक्षांना देण्यात आली आहे. मतदान साहित्याचे वाटप होईल, त्यावेळी मतदान केंद्रावरही प्रसिद्ध करण्यात येईल.

टपाली मतपत्रिका सुविधा

टपाली मतपत्रिकांसाठी 27 दिव्यांग मतदारांनी मागणी केली आहे. त्यांना मतपत्रिका टपालाने व विशेष पथक नेमून पुरविण्यात आल्या आहेत. टपाली मतपत्रिका 3 डिसेंबर रोजी मतमोजणी केंद्रावर सकाळी आठपूर्वी टपाल खात्यामार्फत किंवा वैयक्तिकरीत्या स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  

निवडणूक साहित्याचे वितरण करताना पुनश्च प्रशिक्षण

निवडणूक साहित्याचे वितरण विकेंद्रीकृत पद्धतीने होईल. सर्व मतदान केंद्रांसाठीचे 77 साहित्य संच अमरावती जिल्हाधिकारी स्तरावर तयार करण्यात आले असून, संबंधित जिल्ह्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिका-यांकडे सोपविण्यात आले आहेत. मतदान पथकाला 30 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरावरून साहित्याचे वाटप होईल. त्याचठिकाणी मतदान पथकाला पुन्हा प्रशिक्षण देऊन पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रांवर रवाना केले जाईल.

मतदान प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक साहित्याचे संकलनही विकेंद्रीकृत पद्धतीने होईल. मतदान केंद्रावरील साहित्य सर्वप्रथम जिल्हास्तरावरील सुरक्षा कक्षामध्ये जमा केले जाईल. सर्व मतदान केंद्राकडून साहित्य जिल्हास्तरावर संकलित झाल्यानंतर ते साहित्य विलासनगर येथील शासकीय धान्य गोदामात सुरक्षा कक्षात ठेवण्यात येईल. त्यानुसार सर्व सुरक्षितता उपायांची अंमलबजावणी करत आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रविवारी सायंकाळी प्रचार थांबेल

मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तास म्हणजेच रविवारी (29 नोव्हेंबर) सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येईल.  त्यानंतर उमेदवारांना किंवा राजकीय पक्षांना प्रचार करता येणार नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारेही प्रचार करता येणार नाही. मात्र, प्रिंट मीडिया त्याला अपवाद राहील.

चौदा टेबलवर मतगणना

निवडणुकीची मतमोजणी तीन डिसेंबरला सकाळी आठला सुरू होईल. मतमोजणी कक्षातील दोन हॉलमध्ये प्रत्येकी सात याप्रमाणे 14 टेबलवर मतगणना होईल. मतमोजणी कक्षातील पिजन होल, रिसेप्टिकल, मा. निवडणूक आयोगाला वेळोवेळी माहिती देणे आदी कामे लक्षात घेऊन सुमारे 186 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.  

प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफी व वेबकास्टिंग

प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफी व वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. मतदारांच्या माहिती देण्यासाठी प्रत्येक केंद्रावर मतदार सहायता कक्ष उभारण्यात आला आहे. त्यामुळे मतदारांना मतदान यादीत नाव शोधण्यास मदत होईल. त्याशिवाय, मतदारांना नाव शोधण्यासाठी विभागीय कार्यालयाच्या (http://amravatidivision.gov.in/mlc_election.html), तसेच निवडणूक आयोगाच्या (https://ceo.maharashtra.gov.in/gtsearch1/. ) या संकेतस्थळावरही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आचारसंहिता भंग प्रकरणी आठ गुन्हे दाखल

आचारसंहितेचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यावरून अद्यापपर्यंत आठ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यात नीलेश ताराचंद विश्वकर्मा यांच्याविरुद्ध विनापरवानगी रॅलीचे आयोजन केल्याबद्दल, तसेच श्रीकांत देशपांडे यांच्याविरुद्ध विनापरवानगी प्रचारसभेचे आयोजन केल्याबद्दल, डॉ. नितीन धांडे यांच्याविरुद्ध विनापरवानगी प्रचारसभेचे आयोजन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अकोला जिल्ह्यात रामदासपेठ पोलीस ठाण्यात श्रीकांत देशपांडे यांच्याविरुद्ध विनापरवानगी सभेचे आयोजन केल्याबद्दल, तर बुलडाणा जिल्ह्यातील चिखली पोलीस ठाण्यात डॉ. नितीन धांडे यांच्याविरुद्ध विनापरवानगी प्रचारसभेचे आयोजन, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलीस ठाण्यात किरणराव सरनाईक यांच्याविरुद्ध मतदारांना साड्या, पैसे यांचे प्रलोभन देण्याचा प्रयत्न केल्यामुळे गुन्हा दाखल आहे.

वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर पोलीस ठाण्यात चंद्रकांत पाकधाने व इतर सात यांच्याविरुद्ध शासकीय जागेचा वापर केल्याबद्दल, तर वाशिम पोलीस ठाण्यात किरण सरनाईक यांच्याविरुद्ध मतदारांना साड्या, पैसे यांचे प्रलोभन देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.