केंद्रीय राखीव पोलीस दलातील असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव अनंतात विलीन

आठवडा विशेष टीम―

नाशिक दि. २९भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांचे छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना निधन झाले.

असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांच्यावर सायंकाळी नाशिक शहरातील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्कारस्थळी अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक संजय लाटकर, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, छत्तीसगड सेक्टर उपमहानिरीक्षक राज कुमार, पुणे सेक्टर उपमहानिरीक्षक बी.के.टोपो, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचेसह नागरिक उपस्थित होते.

अंत्यसंस्कार स्थळी पार्थिव येताच राज्य शासनाच्या वतीने अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, निमलष्करी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने महानिरीक्षक संजय लाटकर, नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस आयुक्त दीपक पांडेय, नाशिक पोलीस परिक्षेत्राच्या वतीने परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे, ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यानंतर केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांना अखेरची मानवंदना दिली.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी शहीद नितीन भालेराव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी ताडमेटला परिसरातल्या बुरकाल येथून ६ किलोमीटर अंतरावर स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २०६ कोब्रा बटालियनचे सहायक कमांडन्ट नितीन भालेराव यांना वीरमरण आले होते.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवपूर या गावचे मूळ असलेले शहीद नितीन भालेराव हे नाशिक शहरातील राजीवनगर येथे वास्तव्याला होते. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नाशिकच्या गोखले एज्युकेशन येथे पूर्ण करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून केंद्रीय राखीव दलात दाखल झाले होते. २०१० साली केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झालेले जवान नितीन भालेराव यांनी सर्वप्रथम जम्मू काश्मीर येथील कुलगाम येथे सेवा बजावली होती त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या विशेष संरक्षण टीम मध्ये त्यांनी सेवा दिली होती. त्यानंतर राजस्थानमधील माउंटअबू स्थित अंतर्गत सुरक्षा अकादमीयेथे त्यांनी काम केले होते. जून महिन्यापासून ते २०६ कोब्रा बटालियन मध्ये सहाय्यक कमांडन्ट म्हणून कार्यरत होते.

दरम्यान, नक्षलवादी विरोधी कारवाया रोखण्यासाठी त्यांचे विशेष योगदान होतं. देशांतर्गत झालेल्या विविध लढाऊ स्पर्धेत शहीद नितीन भालेराव यांनी उत्तम कामगिरी केली होती.

शहीद नितीन भालेराव यांच्या पश्चात आई भारती, पत्नी रश्मी, मुलगी अन्वी, तर दोन भाऊ अमोल व सुयोग असा परिवार आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.