पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम― भंडारा दि.30 : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार असून भंडारा जिल्हयातील 18434 पदवीधर मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हयात एकुण 27 मतदान केंद्र असून या ठिकाणी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणूकीची प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर मतदान साहित्यासह मतदान पथक 30 नोव्हेंबर 2020 रोजी रवाना झाल्या आहेत. मतमोजनी 3 डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे.

मतदान केंद्र

तहसील कार्यालय मोहाडी या ठिकाणी 2, नगरपरिषद नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथे 4, नगरपरिषद गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भंडारा येथे 2, लाल बहादूर शास्त्री, कनिष्ठ महाविद्यालय भंडारा येथे 3, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय नवीन इमारत भंडारा येथे 2, पंचायत समिती भंडारा येथे 1, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरी (जवाहरनगर) येथे 1, उत्तर बुनियादी शाळा अड्याळ येथे 1, तहसील कार्यालय पवनी या ठिकाणी 1, समर्थ विद्यालय लाखनी येथे 3, तहसील कार्यालय साकोली येथे 2, जिल्हा परिषद हायस्कूल साकोली येथे 2, तहसील कार्यालय लाखांदूर येथे 2 व जि.प डिजिटल पब्लीक शाळा पालांदूर ता. लाखनी येथे 1 असे एकुण 27 मतदान केंद्र भंडारा जिल्हयात आहेत.

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर पाणी, स्वच्छतागृहे, मदत कक्ष, आवश्यक फर्निचर यांची सुविधा करावी. कोविडच्या अनुषंगाने सामाजिक अंतर, सॅनेटायझरचा वापर, थर्मल गनचा वापर, विना मास्क मतदारांना प्रवेश न देणे, याबाबत खबरदारी घ्यावी. पल्स ऑक्सीमीटरची सुविधाही ठेवावी. मतदान केंद्रांचे निर्जंतुकिकरण करुण घ्यावे. आवश्यक मनुष्यबळाची नेमणूक झाल्याची खात्री करावी. दक्ष राहून मतदान केंद्रांची काटेकोर तपासणी करावी. अशा सुचना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केल्या.

ओळखपत्र आवश्यक

मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्रा व्यतिरिक्त आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, पारपत्र (पासपोर्ट) सेवा ओळखपत्र, खासदार-आमदार यांचे ओळखपत्र, संस्थेने दिलेले ओळखपत्र, विश्वविद्यालयाव्दारे वितरीत पदवी-पदवीका मूळ प्रमाणपत्र व सक्षम प्राधिकरणाव्दारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

मतदानासाठी भर पगारी रजा

पदवीधर निवडणुकीसाठी मतदार असलेल्या मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून भर पगारी रजा देण्यात आली आहे. मतदारांनी या रजेचा उपयोग मतदानासाठी करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मतदान केंद्र परिसरात कलम 144 लागू

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातील निवडणूकीसाठी मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार असून मतदान केंद्र परिसरात 30 नोव्हेंबर 2020 ते 1 डिसेंबर रोजी 24 वाजेपर्यंत कलम 144 अंमलात राहणार आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.