जिल्ह्यात १३१ मतदान केंद्रांवर ६४ हजार ३४९ मतदार बजावतील मतदानाचा हक्क

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

बीड,दि. ३०:- महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२० साठी उद्या मंगळवार दि. ०१ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत मतदान होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील एकूण ६४३४९ मतदार १३१ मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावतील यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक-२०२० ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात निवडणूक कालावधी पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करुन ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात सदर ठिकाणी १ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ७ वाजेपासून मतदान केंद्रावरील संपूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घातले आहेत.

मतदानाच्या पूर्व तयारी करताना संबंधित क्षेत्रीय अधिकारी, मतदान अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण आणि आवश्यक सूचना देऊन मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेवर वेब कास्टिंगद्वारे देखील लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण (सॅनिटॅसेझेशन) करुन आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या मतदान प्रक्रियेतील मतदान केंद्रनिहाय अधिकारी कर्मचारी यांना मतदान साहित्य वितरण, करुन त्यांना मतदान केंद्राकडे पाठविण्यात येत आहेत.

या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार मतदान होणार असून भारत निवडणूक आयोगाने मत नोंदविण्यासाठी मतदांना आवश्यक सुचना जारी केल्या आहेत.

मतदान करण्याची पद्धत

मतदान करण्यासाठी केवळ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळ्या रंगाचा स्केचपेन वापरावा. याशिवाय तुमची मतपत्रिका अवैध ठरेल असे इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन किंवा इतर चिन्हांकित करावयाची साधने वापरू नयेत. “पसंतीक्रम” (Order of Preference) या स्तंभामध्ये, ज्यास तुम्ही पहिला पसंतीक्रम देण्यासाठी निवडले आहे, त्या उमेदवाराच्या नावासमोर १’ हा अंक नमूद करुन त्यास मतदान करता येईल. ”हा अंक केवळ एका उमेदवाराच्या नावासमोर नमूद करता येईल. जरी निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या एका पेक्षा जास्त असेल तरी “१” हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद करता येईल.

निवडून द्यावयाच्या उमेदवारांच्या संख्येव्यतिरिक्त तुम्हाला जेवढे उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तेवढे पसंतीक्रम नोंदविता येतील. उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर तुमचा पुढील पसंतीक्रम २, ३, ४ इत्यादी अंक तुमच्या पसंतीक्रमानुसार “पसंतीक्रम” (Order of Preference) या स्तंभामध्ये दर्शविता येईल.

कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर केवळ एक अंक एकदाच नमूद केला जाईल याची खात्री करावी. आणि एकसमान अंक एका पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावा समोर नमूद केले नसल्याची सुद्धा खात्री करावी. पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल. उदा. १, २, ३, इत्यादी आणि तो एक, दोन,तीन, इत्यादी असा शब्दात दर्शविलेला नसावा.

“पसंतीक्रम” (Order of Preference) स्तंभामधील अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरुपात जसे १,२,३, इत्यादी किंवा रोमन स्वरुपातील I,II,III, इत्यादी किंवा देवनागरी स्वरुपातील १, २, ३ किंवा संविधानाच्या ८ व्या अनुसुचितील भारतीय भाषेतील अंकाच्या स्वरुपात नोंदविला जाईल. मतपत्रिकेवर तुमचे नाव किंवा कोणतेही शब्द, आणि तुमची स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे नमूद करू नयेत. तसेच अंगठ्याचा ठसा सुध्दा उमटवू नये, यामुळे तुमची मतपत्रिका अवैध ठरेल. तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर केवळ किंवा X’ असे नमूद करणे पुरेसे नाही, अशी मतपत्रिका बाद ठरू शकते. आपला पसंतीक्रम केवळ अंकात १,२,३, इत्यादी वर विषद केल्याप्रमाणे नमूद करावा. तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी उमेदवारांपैकी एकाच्या नावासमोर ‘१’ हा अंक तुम्ही दर्शविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम हे ऐच्छिक स्वरुपाचे आहेत. दुसरा आणि त्यापुढील पसंतीक्रम दर्शविणे किंया न दर्शविणे ही बाब तुमच्यासाठी ऐच्छिक आहे.

या कारणामुळे आपले मत अवैध ठरु शकतात

अंक ‘१’ नमूद नसल्यास. एका पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर ‘१’ हा अंक नमूद केलेला असल्यास. ‘१’ हा अंक अशा रितीने नमूद केला आहे का, तो कोणत्या उमेदवारा करिता दिला याबाबत संदिग्धता आहे. ‘१’ हा अंक आणि इतर अंक जसे की, २, ३ इत्यादी एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद केलेले असल्यास. पसंतीक्रम अंका ऐवजी शब्दात नमूद केल्यास. मतदाराची ओळख पटेल असे कोणतेही चिन्ह किंवा लिखान मतपत्रिकेवर नमूद असल्यास. निवडणूक निर्णय अधिका-याने पसंतीक्रम नमूद करण्यासाठी दिलेल्या जांभळ्या स्केच पेन,शिवाय इतर वस्तुने कोणताही अंक नमूद केलेला असल्यास वरील कारणांनी अवैध ठरविण्यात येईल.

या पद्धतीने भारत निवडणूक आयोगाने पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधर मतदारांनी कसे मतदान करावे व आपले मतदान अवैध ठरणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त ९ कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त १) आधार कार्ड २) वाहन चालक परवाना ३) पॅन कार्ड ४) पारपत्र ५) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र ६) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र ७) संबंधित पदवीधर/शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र ८) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र ९) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे.

मतदारसंघात ८१३ मतदान केंद्र

विभागातील आठ जिल्ह्यात या निवडणूकीसाठी एकूण ८१३ मतदान केंद्र असणार आहेत, एकूण ३ लाख ७४ हजार ४५ मतदार असून मतदानासाठी जिल्हानिहाय मतदार व मतदान केंद्रांची संख्या पुढील प्रमाणे आहे.

मतदान केंद्रांची संख्या कंसात दर्शविली आहे.

औरंगाबाद-१ लाख 6 हजार ३७९ मतदार (२०६ मतदान केंद्र) ,जालना- २९७६५ (७४), परभणी – ३२६८१ (७८) , हिंगोली – १६७६४ (३९) ,नांदेड – ४९२८५ (१२३) , बीड – ६४३४९ (१३१) , लातूर – ४११९० (८८) आणि उस्मानाबाद – ३३६३२ (७४) पदवीधर मतदार संघ मध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा समावेश होत असल्याने उद्या होत असलेल्या मतदानाच्या औरंगाबाद विभागातील सर्वच जिल्ह्यात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.