प्रशासकीयब्रेकिंग न्युज

नर्सिंग संर्वगातील वरिष्ठ रिक्त पदे तातडीने भरण्याची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची सूचना

आठवडा विशेष टीम―मुंबई, दि. 7 : नर्सिंग संर्वगातील वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट नवीन रुपात तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी,अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी येथे केल्या.

साथी संस्था, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, युनायटेड नर्सेस असोसिएशन, जनआरोग्य अभियान यांच्या वतीने वेबिनार आयोजित करण्यात आला. राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. कोरोना कालावधीत साथी संस्थेने कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या अनुभवावर सर्वेक्षण केले.त्याबाबत या वेबिनारमध्ये सादरीकरण करण्यात आले.

वेबिनारच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास,संचालक डॉ.अर्चना पाटील, डॉ.अभय शुक्ला, डॉ श्वेता मराठे, नर्सिंग संघटनेच्या प्रा.प्रविणा महाडकर,डॉ. स्मिता राणे उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या पुढाकाराने नर्सेससाठी प्रथमच वेबिनार आयोजित करण्यात आल्याची आणि नर्सेसना आपल्या समस्या,अनुभव मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. कोरोना काळात नर्सेसनी केलेल्या अत्यंत चांगल्या कामाची मांडणी करतानाच त्यांना आलेले अनुभव, अडचणी यावर वेबिनारमध्ये चर्चा करण्यात आली.

कोरोनाचा काळ हा कठीण काळ होता.या कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच आरोग्य सेवेतील कर्मचारी,डॉक्टर्स, शासनाचे विविध विभाग यांनी अत्यंत कष्टाने ह्या आपत्तीला तोंड दिले व आवश्यक उपाययोजना केल्या. याबाबत विविध वक्त्यांनी सर्वांचे कौतुक केले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, साथी संस्थेने नर्सेसच्या अनुभवावर आधारित जे सर्वेक्षण केले आहे ते शासनापर्यंत पोहोचवले जाईल. तसेच त्यावर करावयाच्या उपाययोजनांवर भर दिला जाईल. नर्सेस कॅडरमधील समन्वय करणारी जी वरिष्ठ पदे आहेत ती तातडीने भरण्यात यावी. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट आवश्यक असून त्याबाबतीत अधिक अभ्यास करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी. हिवाळी अधिवेशनानंतर यासंदर्भात बैठक घेण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिली.

रिक्त पदभरतीला चालना- आरोग्यमंत्री राजेश टोपे

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, नर्सेसच्या ज्या रिक्त जागा आहेत, त्या तातडीने भरल्या जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागातील 17 हजार रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे भरण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे विभागातील रिक्त पदभरतीला चालना मिळणार असून आगामी कालावधीत ही पदे भरली जातील.

सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी निधी वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जास्तीचा निधी मिळवू, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली.शासकीय रुग्णालयाची सेवा, स्वच्छता,भोजन व्यवस्था यामध्ये गुणात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्यात आरोग्य संस्थांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे पाच हजार कोटी निधीचा प्रस्ताव दिला आहे. तोही लवकरच मंजूर होईल.

सामान्य जनतेचा सार्वजनिक आरोग्य सेवेवरचा विश्वास वाढावा तसेच ही सेवा परवडणारी, सुलभ आणि दर्जेदार असावी यासाठी प्रयत्न सुरु असून राज्यातील जुन्या रुग्णवाहिका बदलण्यात येत आहेत. पुढील आठवड्यात 500 नवीन रुग्णवाहिका दाखल होतील. असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील रुग्णांना मोफत रक्त मिळण्यासाठी धोरण करणार

राज्यातील गरजू रुग्णांना यापुढे मोफत रक्त मिळावे यासाठी धोरण तयार करण्यात येत असून कुणालाही रक्तासाठी रक्कम मोजावी लागणार नाही, यासाठी निर्णय विचाराधीन असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी डॉ.व्यास, डॉ.अर्चना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ.सुभाष साळुंखे यांनी आरोग्य क्षेत्राचा आढावा घेतानाच भविष्यातील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.

0000

./विसंअ.7.12.2020

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.