आठवडा विशेष टीम―
महाराष्ट्रातील जलदुर्ग यांमध्ये पर्यटन वृद्धी करण्याच्या दृष्टीने विविध उपयोजना राबवाव्यात तसेच यांचे संवर्धन करून येथे पर्यटनास चालना देण्याबाबत चर्चा करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील जलदुर्ग यांचे संवर्धन व्हावे, यांची माहिती महाराष्ट्र, देश यांसह विदेशी पर्यटकांनाही व्हावी यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घ्यावा, असा मानस खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला.
यावेळी श्री.देशमुख म्हणाले, महाराष्ट्राइतके मोठ्या संख्येने किल्ले देशाच्या कोणत्याही इतर प्रांतात सापडणार नाहीत. म्हणून, यांचे संवर्धन करण्यास शासन कटिबद्ध आहे. महाराष्ट्रातील जलदुर्ग हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. याच किल्ल्यांवरून हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली होती. हे सर्व गड-कोट-दुर्ग महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे, शौर्यशाली परंपरेचे साक्षीदार असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व ऐतिहासिक वारशाचे जतन करणे हे सांस्कृतिक कार्य विभागाचे कर्तव्य असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणाले, समुद्रमार्गी असणाऱ्या किल्ल्यांपर्यंतचा प्रवास सुलभरीत्या व्हावा यासाठी शासनाने क्रूझ सेवा सुरू कराव्यात. या क्रूझच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पर्यटकांना समुद्रात असणाऱ्या किल्ल्यांना भेट देणे सोयीस्कर होईल. क्रूझ सोबतच प्रत्येक जलदुर्ग किल्ल्यांमध्ये जेटीची सुविधा उपलब्ध करून देण्याची परवानगी शासनाने उपलब्ध करावी. अशाप्रकारे समुद्र मार्गी वाहतूक वाढवण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग आणि पर्यटन विभागाने समन्वय साधावा.
००००