प्रशासकीयब्रेकिंग न्युज

मेळघाटच्या मुलांचे नीट परीक्षेतील सुयश ही परिवर्तनाची नांदी

आठवडा विशेष टीम―

अमरावती, दि. ७ : कुपोषणाचा प्रश्न असलेल्या मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातून सुविधांचा अभाव असताना तेथील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. मेळघाटची ही लेकरे डॉक्टर होऊन पुन्हा आपल्या भूमीत सेवा बजावणार आहेत. मेळघाटातील परिवर्तनाची ही नांदी असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील बचतभवनात आदिवासी विकास प्रकल्पातर्फे नीट परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंतांचा हृद्य सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, आदिवासी अपर आयुक्त विनोद पाटील, प्रकल्प अधिकारी मिताली सेठी, सहायक प्रकल्प अधिकारी एस. टी. खिल्लारे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व लिफ्ट फॉर अनलिफ्टमेंट संस्थेच्या उलगुलान उपक्रमामुळे मेळघाटच्या दुर्गम गावांतील तेरा विद्यार्थी ‘नीट’ उत्तीर्ण होऊन वैद्यकीय शिक्षणासाठी जात आहेत. हा ऐतिहासिक व आम्हा सर्वांसाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. सुविधांचा अभाव असतानाही दुर्दम्य इच्छा व अथक परिश्रमाची बळावर बारा- बारा तास अभ्यास करून मेळघाटच्या या मुलांनी यश संपादित केले आहे. डॉक्टर होऊन ही मुले पुन्हा मेळघाटच्या सेवेत परतणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपल्या भूमी व समाजाप्रती ते निश्चित बांधिलकी जपतील, असा मला विश्वास आहे.

कुठलीही अडचण आल्यास संपर्क साधा – पालकमंत्री श्रीमती ठाकूर

विद्यार्थ्यांनी डॉक्टर बनण्याची पहिली पायरी चढलेली आहे. यापुढेही त्यांनी दृढ निश्चय कायम ठेवून डॉक्टर बनूनच मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडावे. तुमच्यासोबत शिकण्यासाठी महानगरांतून, शहरांतून मुले येतील. त्यांच्यासोबत वावरताना आपली भाषा किंवा इतर कशाही बाबतीत कुठलाही न्यूनगंड बाळगू नका. तुमची गुणवत्ता उज्ज्वल आहे. कुठलीही अडचण आल्यास थेट मला, आमदारसाहेबांना किंवा प्रशासनाशी संपर्क साधा. आम्ही सगळे तुमच्यापाठीशी आहोत, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

आतापर्यंतच्या सेवेतील अविस्मरणीय क्षण – जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत उत्तीर्ण होऊन नवा इतिहास रचला आहे. माझ्या दहा वर्षाच्या कारकीर्दीत व प्रशासकीय अनुभवात हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. जिथे सुविधांचा अभाव आहे, अशा गरीब आदिवासी कुटुंबात जन्मलेली ही मुले डॉक्टर होण्यासाठी जाताहेत ही मला ख-या अर्थाने शासकीय कामाची फलश्रुती वाटते. जिथे जाल, तिथे आत्मविश्वास बाळगून काम करा. चांगला अभ्यास करा, यश तुम्हाला निश्चितच मिळेल, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

मेळघाटची मुले शिक्षणातही ‘वस्ताद’- आमदार श्री. पटेल

आमदार श्री. पटेल म्हणाले की, मी स्वत: आश्रमशाळेचा विद्यार्थी आहे. माझ्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. मेळघाटची मुले केवळ खेळातच तर शिक्षणातही ‘वस्ताद’ आहेत, हे सिद्ध करणारा हा क्षण आहे. मी विद्यार्थी असताना दहावीला गणिताचा शिक्षकच नव्हता. वर्षातील केवळ पंधरा दिवस अमरावतीच्या एका शिक्षकांनी येऊन तिथे सेवा दिली. त्यामुळे एकच विद्यार्थी तेव्हा पास झाला होता. अशी त्यावेळची परिस्थिती होता. आम्ही शिक्षणात चमकलो नाही तरी राजकारणात ‘मेरिट’ आलो, असे आमदार श्री. पटेल यांनी सांगताच सभागृहात खसखस पिकली.

आम्ही भूमीची बांधीलकी जोपासू- विद्यार्थ्यांचे मनोगत

आम्ही मेळघाटची मुले आहोत. डॉक्टर होऊनच परतू. आम्ही मेळघाटात परतून आमच्या बांधवांची सेवा करू, असे धारणी तालुक्यातील झापल येथील रहिवाशी व मुंबईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या शांतीलाल शालिकराम कासदेकर याने सांगितले. चिखलदरा तालुक्यातील आकी येथील शिवकुमार सावलकर व मल्हारा येथील मयुरी दारसिंबे यांनी मनोगत व्यक्त केले

चिखलदरा तालुक्यातील साव-या येथील राहूल भय्यालाल कासदेकर, धारणी तालुक्यातील आकी येथील अंकुश सावलकर, शिवकुमार सावलकर, उकुपाटी येथील दुर्गेश कासदेकर, कारदा येथील सुधीर मावसकर, मांडवा येथील रोहित कासदेकर, टिटंबा येथील श्याम कोल्हे, राणीगाव येथील श्याम कासदेकर, बेरडाबेल्डा येथील नितेश जांभेकर, मांडवा येथील अजय जांभेकर, चिपोली येथील रेणुका पटोरकर आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button