रायगड (वृत्तसंस्था) : दलितांचे आरक्षण, इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असे प्रश्न मोदी सरकारने सोडविले आहेत. यामुळे एखादया जागेसाठी हट्ट करण्यापेक्षा आरपीआय पक्षाला राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद आणि ५० ते ६० कार्यकर्त्यांना महामंडळावर घेणार आहेत. त्यामुळे एखाद्या जागेसाठी युती सोडणे योग्य नाही, अशी भुमिका केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मांडली आहे.
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये बोलताना आठवलेंनी युती सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय विधानसभा निवडणुकीबाबतचीही बोलणी झाली असल्याचे ते यावेळी म्हणाले. विधानसभेची बोलणी झाली आहे. विधानसभेला देखील काही जागा मिळतील, विधानपरिषदेचीही जागा मिळेल, काही चेअरमनपदे मिळतील, त्यामुळे पक्षाने विचार केला आहे की आपण नरेंद्र मोदी यांना धोका देणे योग्य नसून व्यापक विचार करून हा निर्णय घेतलेला आहे, असे ते यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट झाली. त्यावरही आठवलेंनी उत्तर दिले. शरद पवार आणि राज ठाकरे यांची भेट झाली असली तरी त्याचा कसलाही फरक पडणार नाही. आम्ही सगळे मित्र-पक्ष युती सोबत असल्याने केंद्र आणि महाराष्ट्र राज्यात नरेंद्र मोदींचे(भाजप) सरकार येणार हे निश्चित आहे,असे ते यावेळी म्हणाले.
भारतीय जनता पार्टी कडून सध्या ‘चौकीदार’ ही मोहिम जोरात सुरु आहे. यावरही आठवलेंनी उत्तर दिले. ते यावेळी म्हणाले घराचे, सरकारचे, राहुल गांधी यांचे संरक्षण करण्यासाठी चौकीदार आवश्यक असल्याचे म्हणत भाजपाला २८५ जागा मिळतील आणि एनडीएला ३२५ पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.