संत गाडगेबाबा यांच्या संदेशरथाचा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते शुभारंभ 

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―अमरावती, दि. 1 : अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांच्या निर्मूलनासाठी, तसेच समाजजागृतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या व अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या थोर संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा प्रसार करण्यासाठी संदेशरथाचा शुभारंभ आज नागरवाडी येथे झाला. जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्वत: संदेशरथाचे स्टेअरिंग हाती घेऊन प्रवासाचा शुभारंभ केला.

अखेरच्या क्षणी ज्या वाहनात संत गाडगेबाबा यांचा देह विसावला, ती गाडी जुनी झाल्यामुळे नवीन वाहन घेऊन त्याला जुन्या वाहनासारखेच रूप देऊन त्या वाहनातून गाडगे महाराजांच्या दशसूत्री संदेशाबाबत लोकजागृती संपूर्ण महाराष्ट्रात करण्याचा निर्णय राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतला. राज्यमंत्री श्री. कडू यांच्या पुढाकाराने संत गाडगेबाबा यांचा संदेशरथ लोकजागृतीसाठी महाराष्ट्रभर पुन्हा धावणार आहे. संस्थानचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, मंगेश देशमुख, चांदूर बाजार नगर परिषदेचे नगराध्यक्ष नितीन कोरडे आदी यावेळी उपस्थित होते.

नागरवाडी येथे झालेल्या या सोहळ्यात प्रारंभी. राज्यमंत्री श्री. कडू व सौ. नयना कडू यांच्या हस्ते संदेशरथाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी आरती गाऊन संत गाडगेबाबांना वंदन केले. त्यानंतर राज्यमंत्री श्री. कडू यांनी बसचे स्टेअरिंग हाती घेऊन या रथाच्या प्रवासाची सुरुवात केली. ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’च्या घोषाने नागरवाडीतील वातावरण प्रफुल्लित झाले होते.

gadge baba sandesh rath 1

यावेळी राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले, संत गाडगेबाबा यांनी महाराष्ट्रात या वाहनातून लाखो किलोमीटर प्रवास करत लोकजागरण केले. गावोगावी फिरून दीनदुबळ्यांना भजन- कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. शेवटी याच गाडीत त्यांनी अखेरचा श्वास सोडला. समाजजागृतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या संत गाडगेबाबांचे विचार सर्व लोकांपर्यंत, विशेषत: नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी गाडगेबाबांच्या वाहनाची पुननिर्मिती करून त्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात लोकजागरण करण्यात येणार आहे. संत गाडगेबाबा यांचे विचार सर्वांनी अंगीकारण्याची गरज आहे.

नागरवाडी येथील शाळा बांधकाम व इतर विकासकामासाठी आवश्यक पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण प्रयत्न व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

संत गाडगेबाबा यांनी वैराग्य पत्करून समाजातील गोरगरीबांना अंधश्रद्धेच्या विळख्यातून सोडविण्यासाठी भजन व कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले आहे. त्यांनी स्वत: हातात खराटा घेऊन गावे झाडून स्वच्छतेचा संदेश समाजाला दिला आहे. त्यांनी दिलेल्या दशसूत्रीचा सर्वांनी अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

संत गाडगेबाबा यांनी कीर्तन- भजनाच्या माध्यमातून जनमानसाचे प्रबोधन केले. समाजजागरणासाठी त्यांनी आपल्या वाहनातून खेडोपाडी अहोरात्र फिरून लोकजागृती केली. त्यांचा संदेश घेऊन महाराष्ट्रभर संदेशरथ फिरणार आहे, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.

गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश

भुकेलेल्याला अन्न

तहानलेल्याला पाणी

उघड्यानागड्यांना वस्त्र

गरीब मुलामुलींना शिक्षणात मदत

बेघरांना आसरा

अंध, विकलांग, आजारी व्यक्तींची मदत

बेरोजगारांना रोजगार

पशू-पक्षी, मूक प्राण्यांना अभय

गरीब लोकांच्या मुलांच्या लग्नात मदत

दु:खी आणि निराश लोकांना हिंमत

हाच खरा धर्म आहे आणि हीच खरी ईश्वरभक्ती.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.