आठवडा विशेष टीम― नंदुरबार दि. 4 : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर उपाययोजना करावी आणि कलमाडी गावात प्रत्येक घरातील नागरिकांची कोरोना चाचणी करावी, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले.
ॲड. पाडवी म्हणाले, कोरोना बाधितांची संख्या अधिक असणाऱ्या गावात संचारबंदीचे कठोरतेने पालन करावे. लग्न समारंभात मार्गदर्शक सुचनांचे पालन न करणारे आणि मास्क न घालणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करण्यात यावी. कोरोनाबाधिकांच्या संपर्क साखळीचा शोध घेण्यावर विशेष भर देण्यात यावा. कलमाडीसारख्या अधिक कोरोनाबाधिक आढळणाऱ्या गावात विशेष उपाययोजना कराव्यात.
गृह विलगीकरणात राहणारे बाधित इतरांच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी. कोरोनाबाधित घराबाहेर आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्यात यावी. नागरिक कोरोनाविषयक सुचनांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आल्यास त्या भागात संचारबंदीची कठोरतेने अंमलबजावणी करावी. कोविड केअर सेंटरमधील सुविधांच्या दर्जाबाबत अधिकाऱ्यांनी सातत्याने तपासणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
नंदुरबार येथे एमआरआय स्कॅन व तळोदा येथे लहान ऑक्सिजन यंत्रणा सुरू करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण कोरोना चाचण्यांपैकी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या अधिक असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. कोरोनाबाधित आढळणाऱ्या भागातील चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी कोरोना नियंत्रणात आणण्याबाबत प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यात आतापर्यंत 8436 कोरोनाबाधित आढळले असून त्यातील 7617 बरे झाले आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा दर 133 असून बरे होण्याचा दर 91.82 दर मृत्यू दर 2.1 आहे. डिसेंबर महिन्यात 1215 व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्यातील 1008 बरे झाले. कोरोना लसीकरणासाठी पहिल्या टप्यात 9480 शासकीय आणि 2380 खाजगी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार असून 10087 व्यक्तींची माहिती ॲपवर अपलोड करण्यात आली आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी एकूण 75 कोल्ड चेन पॉईंट्स असणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.