आठवडा विशेष टीम―
शहीदांच्या माता पितांना वंदन करण्यासाठी तसेच त्यांना काही अडीअडचणी असल्यास त्या जाणून घेण्यासाठी आपण आज त्यांच्या भेटीसाठी आलो, अशी भावना यावेळी श्री. कडू यांनी व्यक्त केली. तर ‘भाऊ, आपण असे पहिलेच पालकमंत्री जे इथवर आलेत’! अशा शब्दात शहीद माता पित्यांनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करुन दिली.
आज सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोला शहर व परिसरात राहत असलेल्या भारतीय सैन्यात कर्तव्य बजावतांना वीरमरण आलेल्या शहीदांच्या कुटूंबियांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन भेटी घेतल्या. त्यात शिवनी येथील शहीद प्रशांत प्रल्हाद राऊत, यशवंत नगर वाशिम बायपास येथील संतोष खुशाल जामनिक, पंचशिलनगर येथील आनंद शत्रुघ्न गवई, तर डाबकीरोड येथील सुमेध वामन गवई यांच्या कुटुंबियांच्या भेटी घेतल्या.
या सर्व कुटूंबियांची विचारपूस करुन त्यांना शासनाकडुन मिळालेल्या आर्थिक मदत व अन्य मदतींबाबत चौकशी केली. प्रत्यक्ष पालकमंत्रीच आणि ते ही थेट घरी भेटण्यासाठी आलेले पाहुन कुटुंबिय आश्वस्त दिसून आले. त्यांच्यापैकी काहींना येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा करुन त्या दूर करण्याबाबत त्यांनी तात्काळ प्रशासनातील अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
आज ज्यांच्या कुटुंबियांना भेटी दिल्या त्यापैकी शहीद प्रशांत प्रल्हाद राऊत मु. पो. शिवनी हे दि.२३ मार्च २००७ रोजी शहीद झाले होते. शहीद संतोष खुशाल जामनिक २७ जुलै १९९१ रोजी, शहीद आनंद शत्रुघ्न गवई हे दि.२६ जानेवारी २०१७ रोजी, शहीद सुमेध वामन गवई हे दि.१२ ऑगस्ट २०१७ रोजी शहीद झाले होते.
या सर्व शहीद कुटुंबियांना जर काही अडचणी असतील तर त्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन सोडवाव्यात, असे निर्देशही यावेळी श्री. कडू यांनी दिले.