आठवडा विशेष टीम―
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, प्राचार्य गणेश जोशी, ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी, संपादक शंतनु डोईफोडे, मुन्तजोबोद्दीन मुनिरोद्दीन, आकाशवाणीच्या श्रीमती राजश्री मिरजकर, भारत होकर्णे, कुंवरचंद मंडले, विजय जोशी, माजी जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे तसेच जिल्ह्यातील माध्यमाचे प्रतिनिधी, पत्रकार, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
मागील 6 जानेवारी ते यावर्षीच्या 6 जानेवारीपर्यंत गेलेला कालखंड हा सर्वच दृष्टिने सर्व घटकाला नवे स्थित्यंतर देणारा ठरला आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे जी भयावता व धास्ती समाजात निर्माण झाली होती ती धास्ती घालवून समाजामध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम माध्यमांनी व माध्यमातील प्रतिनिधींनी अत्यंत जबाबदारीने केले या शब्दात जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी पत्रकारांच्या योगदानाचा गौरव केला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, कोविड-19 मुळे जे व्यक्ती बाधित झाले त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यासाठी प्रशासनाने जी प्रयत्नाची पराकाष्ठा केली तेवढीच पराकाष्ठा पत्रकारांनीही समाजात अफवा पसरु नयेत यादृष्टीने वस्तुस्थिती वेळोवेळी समाजापुढे मांडून लोकशिक्षकाची भूमिका बजावली आहे.
लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या आवाजाला महत्व आहे. हे लक्षात घेऊन आज माध्यमातील क्रांतीमुळे जी वेगवेगळी डिजिटल माध्यमे समोर येत आहेत त्याचे आपण स्वागत करुन या माध्यमांसाठी काम करणाऱ्या नव्या पिढीला नैतिक आणि लोकशाही मुल्यांचे बळ दिले पाहिजे, असे रापतवार यांनी स्पष्ट केले. शाळेत विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची जशी आवश्यकता असते त्याच धरतीवर लोकशाही भक्कम करण्यासाठी पत्रकारांवर समाजाच्या शिक्षणासाठी लोकशिक्षकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जेष्ठ पत्रकार कमलाकर जोशी यांनी माध्यमशास्त्राच्या विद्यार्थी व विद्यार्थीनीना मार्गदर्शन करताना पत्रकार हा समाजाचा चौकीदार, पहारेकरी असून पत्रकारामध्ये नैतिकता व चारित्र्य या गोष्टी असणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे यांनी दर्पणदिन हा पत्रकारासाठी आत्मचिंतन करण्याचा दिवस असल्याचे स्पष्ट करुन गत एक वर्षातील कोरोनाचे आव्हान स्विकारुन माध्यमांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. या काळात बातम्या आणि बातम्यांचे संपादन करतांना कधी नव्हे तेवढी काळजी घ्यावी लागली असे स्पष्ट केले. घटनेतील 19 व्या कलमाने व्यक्ती स्वातंत्र्याला दिलेली मुभा ही कुणाच्या अधिकारावर व स्वातंत्र्याला धक्का पोहचविणारी तर नाही ना याची अधिक काळजी घेण्याचे शिक्षण गतवर्षाने माध्यमाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक नांदेड टाइम्स उर्दूचे संपादक मुन्तजोबोद्दीन मुनिरोद्दीन यांनी आपल्या मनोगतात नांदेडच्या पत्रकारिता क्षेत्रात महिलांचा सहभाग कमी असून या क्षेत्रात काम करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. तसेच यावेळी आकाशवाणीच्या राजश्री मिरजकर यांनी विद्यार्थींनींना या क्षेत्रात आवाहन करुन उपस्थित विद्यार्थींनींना प्रोत्साहन दिले. इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे भारत होकर्णे, कुंवरचंद मंडले यांनीही यावेळी संवाद साधला.
प्राचार्य गणेश जोशी यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत करुन एमजीएम महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. पत्रकारिता प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न होण्यासाठी महाविद्यालयातर्फे आवर्जून पत्रकार दिनासारखे उपक्रम सातत्याने विनाखंड सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार शीतल महाजन यांनी केले.