प्रशासकीयब्रेकिंग न्युज

वैचारिक परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी रचला – गिरीश कुबेर

आठवडा विशेष टीम―

नवी मुंबई, दि. ७ :- महाराष्ट्राची वैचारिक परंपरा सर्वश्रेष्ठ आहे. ही परंपरा जपण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राची भूमी विचार देणारी आहे. महाराष्ट्र ज्या विचारवंतांसाठी ओळखला जातो. त्या वैचारिक परंपरेचा पाया जांभेकरांनी रचला आहे, असे प्रतिपादन दै.लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केले.

“२१ व्या शतकातील २१ वे वर्ष : आव्हाने” या परिसंवादात ते बोलत होते.

नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने, विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग यांच्या सहकार्याने पत्रकार दिनानिमित्त विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी, नवी मुंबई येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास सचिव तथा महासंचालक माहिती व जनसंपर्क डॉ.दिलीप पांढरपट्टे, सामाजिक कार्यकर्ते डॉ.विश्वंभर चौधरी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित होते.

यावेळी बोलताना गिरीश कुबेर म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकरांच्या कारकिर्दीतील ‘दर्पण’ हे सर्वात छोटे कार्य होते. यापेक्षाही महत्त्वाचे आणि मोठे कार्य त्यांनी त्यांच्या जीवनात केलेले आहेत. त्यांची भाषणे ऐकायला अनेक मान्यवर पहिल्या रांगेत बसत असत. जांभेकरांच्या कार्यांची माहिती महाराष्ट्राला होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र ज्या विचारवंतांसाठी ओळखला जातो. त्या वैचारिक परंपरेचा पाया जांभेकरांनी रचला आहे. या विचारांचा धागा तुटता कामा नये. पुढे ते म्हणाले की, देशाची प्रगती हवी असेल, तर लघुउद्योगांची प्रगती होणे आवश्यक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानावर अधिक खर्च होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र ही कार्यकर्त्यांची भूमी आहे. याच देशात उजवे आणि डावे देखील आहेत. स्वतंत्रपणे विचार करण्याची आवश्यकता आहेच, परंतु प्रश्‍न विचारण्याची खरी गरज देखील आहे. धर्म आणि नितीमत्ता याचा काही संबंध नसतो. महाराष्ट्रात तर्कवादाचा उदय बाळशास्त्री जांभेकरांपासून सुरु झाला हे लक्षात घेतले पाहिजे असेही श्री.कुबेर म्हणाले.

महाराष्ट्रातल्या साहित्य संस्कृती व कला संदर्भात बोलताना सचिव तथा महासंचालक माहिती व जनसंपर्क डॉ.दिलीप पांढरपट्टे म्हणाले की, महाराष्ट्र हा साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात देशात अग्रेसर आहे. महाराष्ट्राच्या भूमीने अनेक मोठे साहित्यिक व कलाकार या देशाला दिले आहेत. त्यांचे साहित्य व कलाकृती आजही अजरामर आहेत. आजच्या साहित्य संमेलनामध्ये साहित्याची हानी होत आहे. मराठी साहित्यांमध्ये लोकप्रियतेचा धोका आहे. यातून साहित्यकारांनी बाहेर पडणे आवश्यक आहे. साहित्यकाराने कधीही प्रेक्षकांच्या प्रतिसादाची अपेक्षा ठेऊ नये, नेहमी स्वतःला स्वतःच दाद दिली पाहिजे. आज साहित्यात खरं लिहिण्याची आवश्यकता आहे आणि हेच मोठे आव्हान आहे. आतापर्यंत मोठ-मोठे दिग्गज लेखक वर्तमानपत्रात लिहित होते. येणाऱ्या काळात याचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे. संकूचित मनोगति दूर करण्याची आवश्यकता आहे. कोणतीही कलाकृती जिवंत असावी, जे मांडायचे आहे, ते मुक्तपणे मांडू दिले पाहिजे. असे मत डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी यावेळी मांडले.

सामाजिक कार्यकर्ते डॉ.विश्वंभर चौधरी म्हणाले, या देशाने आजही महात्मा गांधी यांचे विचार स्वीकारण्याची आवश्यकता आहे. लोकशाही अधिक सदृढ करण्यासाठी घटनेनुसार कार्य होण्याची आवश्यकता आहे. शासनाने शिक्षण आणि आरोग्य या दोन महत्‍त्वाच्या बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे. देशाचा वैज्ञानिक विचार व दृष्टीकोन वाढविण्याची गरज आहे.  शालेय शिक्षण अभ्यासक्रमात राज्यघटना हा विषय शिकवणे आवश्यक आहे.  गांधीजींनी विकेंद्रीकरणाची भूमिका मांडली होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही. प्रशासकीय आणि राजकीय विकेंद्रीकरण होणे आवश्यक आहे. सद्या लोकशाहीचे केंद्रीकरण होते आहे, हेच खरे मोठे आव्हान आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. उपसंचालक (माहिती) कोकण विभाग डॉ.गणेश मुळे यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल माहिती दिली व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी केले.

कार्यक्रमात क्रियाशिल प्रेस क्लब पनवेलच्यावतीने प्रेस क्लबचे संस्थापक विजय कडू व पदाधिकारी यांनी सचिव तथा महासंचालक माहिती व जनसंपर्क डॉ.दिलीप पांढरपट्टे यांचा सत्कार केला.

या कार्यक्रमास  पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगसह सॅनिटायझरचा योग्य वापर करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्टसचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button