प्रशासकीयब्रेकिंग न्युज

महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; राज्यात बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम नियमित सुरू – केदार

आठवडा विशेष टीम― मुंबई दि.7 : राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमुने, विष्ठेचे नमुने तसेच रक्तजल नमुने तपासणीत बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे. राज्यात बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम नियमित राबविण्यात येत असून पुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्लू नसल्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

श्री. केदार म्हणाले,पशुसंवर्धन विभागाद्वारे दरवर्षी बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांच्या घशातील द्रवांचे नमुने, विष्ठेचे नमुने तसेच रक्तजल नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात येतात. यांची तपासणी पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा, पुणे या 5 राज्यांसाठी पशुरोग निदानाच्या शीर्षस्थ प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात येतात. सन 2020-21 मध्ये या संस्थेने आजतागायत राज्यातील एकूण 1715 विष्ठा नमुने, 1913 रक्तजल नमुने 1549 घशातील द्रवांचे नमुन्यांची तपासणी आरटीपीसीआर आणि एलायझा या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेली आहे. तपासणीअंती वरील सर्व नमुने बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे.

श्री. केदार म्हणाले, स्थलांतरित होणाऱ्या जंगली पक्षांमध्ये, कावळ्यांमध्ये, परसातील कोंबड्यांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुटपालन करणाऱ्या ठिकाणावर बर्ड फ्लू रोगाचे सर्वेक्षण अधिक प्रखरपणे राबविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे निर्गमित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात अद्यापपावेतो वन्य व स्थलांतरित पक्ष्यांमध्ये, कावळ्यांमध्ये अथवा कोबड्यांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही अथवा या रोगामुळे मृत्यू झाल्याचे देखील दिसून आलेले नाही. त्यामुळे कुक्कुटपालक. अंडी व मांस खाणाऱ्या मांसाहारी नागरिकांनी अकारण घाबरण्याची परिस्थिती नाही.तसेच स्थलांतरित होणाऱ्या जंगली पक्षांमध्ये, कावळ्यांमध्ये, परसातील कोंबड्यांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुटपालन होणाऱ्या ठिकाणावर असाधारण स्वरुपाचा मृत्यू आढळून आल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन श्री.केदार यांनी केले.

बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळ राज्यामधील स्थलांतरित पक्षामध्ये आढळून आला आहे.हिमाचल प्रदेश या राज्यातील कांगडा जिल्ह्यातील पांग धरणाच्या परिसरात सायबेरिया आणि मंगोलिया या देशामधून स्थलांतरित झालेल्या डोक्यावर दोन पट्या असणाऱ्या बदकांमध्ये मृत्यू आढळून आले आहेत. निशाद (नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हायसिक्युरिटी अॅनिमल डिसीजेस. भोपाळ) या राष्ट्रीय संस्थेने मृत्यूसाठी बर्ड फ्लू रोगाचा H५N१ स्ट्रेन कारणीभूत असल्याचे निदान केले आहे, हिमाचल प्रदेश राज्यातील वन विभागांद्वारे पाणथळ जमिनीशेजारच्या भागामध्ये या रोगाच्या सर्वेक्षणाचा मोठया प्रमाणात कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button