आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. 7 : औद्योगिक कारणासाठी दिलेल्या भूखंडावर शासनाची परवानगी न घेता, 200 कोटींचा महसूल न भरता बांधकाम केले जाणे ही गंभीर बाब असून यासंदर्भात फेरतपासणी करून सर्वंकष आढावा सादर करावा, अन्यथा यासंदर्भात विधिमंडळाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जाईल, असे विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी सांगितले.
औद्योगिक प्रयोजनार्थ सूट दिलेल्या परंतु नंतर बांधकाम झालेल्या ठाणे येथील जमीन प्रकरणासंदर्भात माजी नगरसेवक, ठाणे म.न.पा. श्री.रामभाऊ तायडे यांच्याकडून प्राप्त झालेल्या निवेदनासंदर्भात विधानभवन, येथे बैठक झाली. या बैठकीस ठाणे जिल्हाधिकारी श्री.राजेश नार्वेकर, महसूल व नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
औद्योगिक प्रयोजनार्थ हस्तांतरित केलेल्या मौजे पाचपाखाडी, ता.जि. ठाणे येथील 18165.20 चौ.मि. चा भूखंड परवानगी न घेता विक्री केला गेला. हस्तांतरण, विक्री व्यवहार यासंदर्भात चौकशी करून पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी दिले.