आठवडा विशेष टीम―
गडचिरोली मधील आरोग्य सुविधा चांगल्याच : नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी राज्यमंत्री यांनी केली. त्याठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्था, लाईट, ऑक्सिजन व्यवस्था व इतर यंत्रसामुग्री ही अतिशय उत्तम असून राज्यातील प्रमुख दवाखान्यातील सुविधेपेक्षा चांगली असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील इतर विभागांचीही पाहणी केली. तसेच नव्याने स्थापन झालेल्या आरटीपीसीआर लॅबचीही पाहणी केली. गडचिरोली जिल्ह्यात कोरोना काळात जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उभारल्या गेल्या. यामध्ये आरटीपीसीआर प्रयोगशाळा, प्रत्येक तालुक्यात कोविड केंद्र, मनुष्यबळ भरती तसेच आता अद्यावत असे अतिदक्षता विभाग यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट झाली आहे. भविष्यात अजून याबाबतचा पुढिल विस्तार पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली केला जाईल असे ते पुढे म्हणाले. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आध्यक्षतेखाली बैठक घेऊन मुंबई येथे जिल्ह्यातील आरोग्य सुविधेबाबत असणाऱ्या मागण्याबाबत चर्चा करु असे आश्वासन आरोग्य विभागाला त्यांनी यावेळी दिले. आरोग्य विभागातील कामकाजाचा सविस्तर आढावा त्यांनी यावेळी घेतला. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, मलेरिया साथ, रिक्त पदे, इतर अडीअडचणी त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला रुग्णालयात मोठया प्रमाणात रुग्ण येत असतात त्यामूळे त्या ठिकाणचे फायर ऑडीट तातडीने करुन घेणे व आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच फायर अलार्म बाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन मध्ये प्रस्तावित आहे त्यासाठी प्रशासन तातडीने निर्णय घेईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
रिक्त पदे लवकरच भरणार : आरोग्य विभागातील जिल्ह्यात असलेली 25 टक्के रिक्त पदे तातडीने भरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. नुकताच राज्य शासनाने रिक्त पदांपैकी 50 टक्के जागा भरा असा आदेश दिला आहे. त्यानूसार गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा पदभरती वेळेत होईल. यामध्ये आरक्षण हा मुद्दा राज्यभर सद्या सुरु आहे. त्यावरही लवकरच तोडगा निघेल असे त्यांनी याचेळी सांगितले.
शालीनी कुमरे यांचा सत्कार :जिल्हा सामान्य रुग्णालयातील 35 वर्ष सेवा केलेल्या व नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या अधिसेविका शालीनी कुमरे यांचा सत्कार राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाला. त्यांचे नामांकन राष्ट्रपती पुरस्कारासाठी नुकतेच करण्यात आले आहे. उत्कृष्ट परिचारिका म्हणून राष्ट्रपती पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या त्या जिल्ह्यातील एकमेव महिला परिचारिका आहेत.