आठवडा विशेष टीम―नागपूर, दि. 10 : बहुजन नायक, स्वातंत्र्यसैनिक व माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त आज नागपूर येथील विधानभवन प्रांगणात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पशुसंवर्धन तथा क्रीडामंत्री सुनील केदार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
कन्नमवार दिनदर्शिका २०२१ तसेच दादासाहेब कन्नमवार तैलचित्राचे विमोचन यावेळी करण्यात आले. कन्नमवारांच्या विचारधारेला सोबत घेऊन चालणाऱ्या विविध क्षेत्रातील पाच समाजव्रतींचा सत्कार यावेळी करण्यात आला. दादासाहेब कन्नमवार यांच्यावरील लिखाण कार्यासाठी प्रभाताई वासाडे (कला गौरव), दिव्यांग क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल दिनेश गेटमे (दिव्यांग गौरव), चांपा येथे विकासाची गंगा निर्माण करणारे सरपंच आतिश पवार (समाजकारण गौरव), दादासाहेब कन्नमवार यांचे २००८ पासून प्रचार प्रसार करणारे राजेंद्र बढिये (समाज गौरव) तर पत्रकार राकेश भिलकर (पत्रकारिता गौरव) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
रक्तदान शिबीराचे आयोजन अमन ब्लड बॅंकच्या सहयोगाने करण्यात आले होते. यात डॉ.रोहित माडेवार, रवींद्र बंडीवार, खिमेश बढिये, धीरज भिसीकर, प्रवीण पौनीकर यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे संचालन खिमेश बढिये तर आभार प्राचार्य प्रदिप बिबटे यांनी मानले.