प्रशासकीयब्रेकिंग न्युज

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची भंडारा येथे सांत्वना भेट

आठवडा विशेष टीम―अमरावती, दि. 11 : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयास लागलेल्या आगीत मृत पावलेल्या दहा बालकांच्या मातेस व कुटुंबास नियमितपणे सेवा-समुपदेशन व आवश्यक ती मदत मिळवून देण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज भंडारा येथे दिले. महिला व बालविकास मंत्र्यांच्या निर्देशानुसार त्या संदर्भातील आदेश एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी निर्गमित केला असून, तसे पत्र भंडारा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.

महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी आज भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयास लागलेल्या आगीमध्ये रुग्णालयात दाखल असलेल्या दहा बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. सदर घटनेत मृत पावलेल्या बालकांच्या आईची व कुटुंबियाची मानसिक स्थिती नाजूक झालेली असल्याने त्यांना धीर व समुपदेशन करण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या कर्मचारी व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांव्दारे संबंधितांना तात्काळ सेवा देण्यात यावी. घटनेत मृत झालेली बालके ज्या अंगणवाडी परिक्षेत्रातील आहे तेथील अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकांनी, आशा वर्कर व आरोग्य सेविका यांनी संबंधित मातांना व कुटुंबियांना समुपदेशन व आवश्यक सेवा देण्याचे निर्देश विभागाव्दारे देण्यात आले आहेत.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  या सर्व मातांची आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी करावी. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेविका नियमितपणे समुपदेशन करावे. ही मदत व सेवा सदर मातेची मानसिक परिस्थिती पूर्व पदावर येईपर्यंत चालू ठेवावी. संबंधितांना काही मदत लागल्यास तात्काळ मदत उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

  घटनेत मृत पावलेली बालके संबंधित रुग्णालयात कुठल्या कारणास्तव दाखल करण्यात आली होती याबाबतचा अहवाल बालकांच्या नावासहित तसेच अद्यापपर्यंत कार्यवाहीचा अहवाल तत्काळ एकात्मिक बाल‍ विकास सेवा योजनेच्या आयुक्तांना सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

  शासनाने सविस्तर चौकशीचे आदेश दिले असून, वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यानंतर त्वरित कारवाई केली जाईल. या दुर्देवी घटनेमुळे पुन्हा नियमित कालावधीत फायर ऑडिट व इतर सुरक्षा यंत्रणा तपासणीची आवश्यकता स्पष्ट झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.