आठवडा विशेष टीम―
आरमोरी येथील रेशीम केंद्रावर सात एकरांमध्ये कार्यालय परिसरात टसर रेशीम केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या रेशीम केंद्राच्या अंतर्गत जिल्ह्यातील 400 हेक्टर वन क्षेत्रामध्ये रेशीमची निर्मिती केली जाते. यावेळी राज्यमंत्री श्री. पाटील यांनी टसर रेशीम निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली. टसर रेशीम कापडाला भरपूर मागणी असल्यामुळे देशाला परकीय चलन मिळवून देणारा हा उद्योग आहे असे मत व्यक्त केले. टसर कोष उत्पादन तसेच टसर सूत उत्पादन आणि तसेच कापड उत्पादन इत्यादी प्रक्रियेमध्ये रोजगाराची प्रचंड क्षमता आहे त्यामुळे जिल्ह्यातील टसर कोष उत्पादन वाढीवर भर देऊन गडचिरोली जिल्ह्यातील ढिवर तसेच आदिवासी समाजातील जास्तीत जास्त कुटुंबांना याचा फायदा होईल याकडे लक्ष द्यावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
टसर लाभार्थींचा मुख्य व्यवसाय मासेमारी असून काही अल्पभूधारक आहेत. या व्यवसायाला जोडधंदा म्हणून ते टसर कोष उत्पादनाचा व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना आवश्यक मार्गदर्शन करून तसेच रेशीम उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबवाव्यात यासाठी शासन आवश्यकतेनुसार आपणाला मदत करेल असे आश्वासन यावेळी राज्यमंत्र्यांनी संबंधित प्रशासनाला दिले. राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी टसर रेशीम सूत निर्मिती प्रशिक्षण केंद्र तसेच टसर कोष निर्मिती प्रक्रिया, रेशीम यंत्र पाहणी करून याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी रीलींग बंदा कोष, चलपट कोष, दुदरू कोष यामधील प्रक्रिया प्रत्यक्ष पाहणी करून माहिती जाणून घेतली. या ठिकाणी उपस्थित टसर रेशीम कर्मचारी यांच्याशी संवादही साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी.व्ही.आव्हाड, अशोक विसपुते आदी उपस्थित होते.