आठवडा विशेष टीम―
शेतकऱ्यांच्या धान्य साठवणुकीसाठी मंडळ स्तरावर गोदामे उपलब्ध करण्याबाबत वेबिनारद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस वखार महामंडळाचे अध्यक्ष दिपक तावरे, कृषी विभागाचे सहसचिव गणेश पाटील, पोखरा योजनेचे प्रकल्प संचालक विकास रस्तोगी, नागपूर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तापेश्वर वैद्य, शेतकरी अॅड.निलेश हेलोंडे पाटील आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, हवामान बदलांमुळे उद्भवणाऱ्या संकटांनी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते आहे. शेतकऱ्यांना धान्य साठवणूक करण्यासाठी गोदामे उपलब्ध असल्यास त्यांचे नुकसान होणार नाही. धान्य साठवणूक करून आवश्यक तेव्हा विकण्याची मुभा शेतकऱ्यांना मिळण्यासाठीची चळवळ व्यापक होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचा विशेष सहभाग घेऊन कृषी विभाग आणि वखार महामंडळाच्या सहाय्याने गोदाम उभारणे, त्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि दारिद्रय निर्मुलनासाठी पोखरा योजनेमध्ये लोकांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे. रोजगार हमी योजनेतून गोदामे बांधकाम घेता येईल का याबाबत कृषी विभागाने रोहयो विभागामध्ये प्रयत्न करावा. धान्याची साठवण करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने बनविण्यात आलेल्या बॅगची माहिती अधिकाअधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.
वखार महामंडळामार्फत राज्यात २०४ ठिकाणी अकराशे गोडाऊन आहेत. पोखरा योजेनेअंतर्गत राज्यातील १५ जिल्ह्यात पाच हजार १४५ गावांचा समावेश असून, शासन आणि जागतिक बँकेच्या सहाय्याने गोदामे बांधण्याचे काम सुरू आहे. गटशेती योजना, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजना कृषी विभाग आणि मंडळांमार्फत राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
००००