प्रशासकीयब्रेकिंग न्युज

मृत बालकांच्या मातांच्या आरोग्याची काळजी घ्यावी :यशोमती ठाकूर

आठवडा विशेष टीम―

भंडारा, दि. 11 : भंडारा येथील सामान्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या बालकांच्या मातांची नियमित आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. श्रीमती ठाकूर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन घटनेची पाहणी केली.

जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक प्रदीप काठोळे, सिडीपीओ राहूल निपसे तसेच अन्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीसंदर्भात संपूर्ण घटनाक्रमाची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याकडून श्रीमती ठाकूर यांनी घेतली. शिशू केअर युनिटला मध्यरात्री लागलेल्या आगीत आयसीयुमध्ये भरती असलेल्या दहा बालकांचा मृत्यू झाला तर सात बालकांना वाचविणे शक्य झाले. आग विझविण्यासाठी सुरक्षा रक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर अग्निशमन विभाग तात्काळ घटनास्थळी पोहचल्यामुळे आगीवर नियंत्रण शक्य झाले. सामान्य रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका यांनी तात्काळ बालकांना इतर वॉर्डात हलविले. तसेच नातेवाईकांना बालकांचे मृतदेह सुपुर्द करण्यात आले. सानुग्रह अनुदानाची रक्कम सुद्धा तात्काळ वितरीत करण्यात आली. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याच्या दृष्टीने न्यायवैद्यक तज्ज्ञांची टिम, इलेक्ट्रीकल निरीक्षक, व्हीएनआयटी,राष्ट्रीय अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तज्ञ, विद्युत, सार्वजनिक बांधकाम आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यांचा अहवाल लवकरच मिळणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा यांना पत्र पाठवून मातांची अंगणवाडी सेविका, आशा व एएनएम यांचे कडून नियमित आरोग्य तपासणी करुन आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे निर्देश दिले. घटनेत मृत झालेली बालके संबंधित रुग्णालयात का दाखल करण्यात आली होती, याबाबतचा अहवाल तात्काळ आयुक्तालयास पाठविण्याचे निर्देशही या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

मृत बालकांच्या मातांच्या आरोग्याकडे लक्ष द्या

मृत बालकांच्या मातांना नियमित समुपदेशन करुन त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याच्या सूचना ॲङ यशोमती ठाकूर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या. मातांची घरपोच आरोग्य तपासणी डॉक्टर्सनी करावी व दैनंदिन अहवाल आशा मार्फत मला कळवावा. यासाठी स्वयंसेवी संस्थांची सुद्धा मदत घ्यावी, असे ॲड.ठाकूर यांनी सांगितले.

जळीत प्रकरणांतील मृत बालकांच्या माता योगिता विकेश धुळसे श्रीनगर व रावणवाडी येथील वंदना मोहन सिडाम यांना ॲड.ठाकूर यांनी भेट देवून त्यांचे सांत्वन केले, मातांच्या आरोग्याविषयी कोणतीही हयगय होता कामा नये. मातांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

0000

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.