आठवडा विशेष टीम―नागपूर, दि. 11 : शहरातील गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी पोलीस विभाग उत्तम कामगिरी करीत आहे. नागरिकही सजगता बाळगून पोलिसांना सहकार्य करीत आहेत. या शिबिराच्या माध्यमातून पोलीस आणि नागरिक यांच्यातील संबंध अधिक वृद्धिंगत होत आहेत, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले. यावेळी 75 तक्रारदारांनी आपली गाऱ्हाणी मांडली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, नवीनचंद्र रेड्डी, डॉ. दिलीप झळके, उपायुक्त विनीता साहू, लोहीत मतानी, अक्षय शिंदे, निलोत्पल, गजानन राजमाने, विवेक मसाळ, सारंग आव्हाड, डॉ. बसवराज तेली, डॉ. संदीप पखाले तसेच महापालिका उपायुक्त मिलिंद मेश्राम, महेश मोरोने, नागपूर सुधार प्रन्यासचे कार्यकारी अभियंता एस. एन. चिमुरकर, सह उपनिबंधक किशोर बलिंगे, अनंत अरमरकर, सह जिल्हा निबंधक अ. स. उघडे, महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे उपसंचालक आर. पी. चौरसिया, नगर भूमापन अधिकारी सतीश पवार, जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसीलदार सूर्यकांत पाटील, भूमि अभिलेख अधीक्षक गजानन दाबेराव तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मोठ्या शहरांमध्ये विविध आमिषे दाखविण्यासह दबाव व दहशत निर्माण करुन कोट्यवधी रुपयांचे भूखंड बळकावून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जाते. असे कृत्य करणाऱ्या असामाजिक तत्त्वांवर वेळीच निर्बंध आणणारे दुसरे विशेष तक्रार निवारण शिबिर श्री. देशमुख यांच्या उपस्थितीत आज येथे पार पडले.
वाढत्या गुन्हेगारीला जेरबंद बसविण्यासाठी अनेक असामाजिक तत्त्वांवर मोक्का लावण्यात आला. तर काहींना तडीपार करण्यात आले आहेत. तरीदेखील भूखंडाच्या बाबतीत फसवणूक, हवाला ऑपरेटर, भूखंडावर अतिक्रमण, डब्बा ट्रेलर, अवैधधंद्यांना आळा घालून वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसावा व नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तातडीने व्हावे, यासाठी विशेष तक्रार निवारण शिबिर आयोजित करण्यात येते. या शिबिराला नागरिक सुसंवाद साधून उत्तम प्रतिसाद देत आहेत.
या शिबिरात गुंडगिरी, भूमाफिया, अवैध व्यवसाय, आर्थिक फसवणूक, अतिक्रमण करणे, अवैधरित्या मालमत्तेवर ताबा मिळविणे अशा स्वरुपाच्या 75 तक्रारी आल्या. नागरिकांनी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी त्यासंबंधित संस्थेची खातरजमा करावी. कोणाच्याही आमिषांना किंवा भूलथापांना बळी पडू नये. नागरिकांना भयमुक्त जगता यावे, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही श्री. देशमुख यावेळी म्हणाले.
नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी तसेच पोलीस विभागाचे झोनल अधिकारी यांच्या समन्वयाने दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. या शिबिरात शहराच्या विविध भागातील भूमाफियांच्या कारवाईबाबत नागरिकांनी ठोस तक्रारी केल्यात. यासंबंधात पोलिसांच्या नोंदी, नागरिकांच्या तक्रारी तसेच याबाबत वस्तुस्थितीवर चर्चा झाली.
प्रथम विशेष तक्रार निवारण शिबिर गेल्या ऑक्टोबरमध्ये घेण्यात आले होते. यावेळी दाखल झालेल्या 50 अर्जांवर पोलीस विभाग तसेच शासनाच्या इतर प्रशासकीय विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे.