आठवडा विशेष टीम―
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 13 : पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी करण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेतली. जिल्हा क्रीडा संकुल परिसरात जंबो कोविड सेंटर उभारण्याचे नियोजन करावे त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.के.डी.सातपुते, डॉ.राजेश वसावे, अधिपरिसेविका निलिमा वसावे आदी उपस्थित होते.
कोरोना बाधितांना चांगल्या सुविधा देण्यात याव्यात. रुग्ण लवकर बरे होऊन घरी जातील यासाठी विशेष प्रयत्न करावेत. कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता अधिक सुविधा निर्माण करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. रुग्णालयातील सुविधा व गरजांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जंबो कोविड सेंटर उभारण्याची तयारी करावी आणि त्याठिकाणी ऑक्सिजन प्लँटचेदेखील नियोजन करावे, असे ॲड.पाडवी यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी पीपीई कीट घालून कोविड कक्षातील व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. रुग्णालयात चांगले उपचार होतील. रुग्णांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी घेतली कोरोना लसीची दुसरी मात्रा
पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी जिल्हा शासकीय रुग्णलयात कोरोना लसीची दुसरी मात्रा (डोस) घेतली. परिचारिका सुनयना पाथरे यांनी ही लस दिली. पालकमंत्र्यांनी सुनयना यांना धन्यवाद दिले आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले. कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित असून 45 वर्षांवरील नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
00000