आठवडा विशेष टीम―
नागपूर, दि. 14: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळातील भारतीय समाजरचनेचा, येथील अनिष्ठ रुढी-परंपरांचा आणि अस्पृश्यतेचा जवळून अनुभव घेतला. त्यामुळे भारतीय समाजरचनेत येथील उच्चवर्णीय समाजाने अस्पृश्य समाजाला बहिष्कृत केले होते. त्या समाजाचा उद्धार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ‘वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतीय समाजरचनेत हिंदू धर्मातील चातुवर्ण्य समाजरचनेत अस्पृश्य समाजाला बरोबरीचे स्थान नव्हते. त्यामुळे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपुरातील दीक्षाभूमी परिसरात बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांच्यासोबत अनेक बांधवांनी धर्मांतर केले. शांततापूर्ण मार्गाने स्वत:हून केलेले हे धर्मांतर जगातील सर्वात मोठे ठरले. डॉ. आंबेडकरांनी हे धर्मांतर का केले, याचाही स्वतंत्रपणे विचार करण्याची गरज अभ्यासकांनी करणे आवश्यक असून, दीन-दलित, अस्पृश्य समाजाला जगात ताठ मानेने जगता यावे, त्यांचा स्वाभिमान जागृत राहावा, आणि तो जागृत करण्याचे कार्य या धर्मांतराने केले असल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले.
आपल्या लेखनीतून समाजाला माणुसकी शिकवली. सर्व दलित, शोषित आणि उपेक्षित समाजाला डॉ. बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यासाठी त्यांनी शाळा, महाविद्यालये आदी शैक्षणिक संस्थांची निर्मिती करुन या वर्गाला शिक्षणाची कास धरण्यासाठी प्रवृत्त केले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वांच्या मूल्यांवर देश निर्माण करण्याची डॉ. आंबेडकरांकडे दूरदृष्टी होती. सामाजिक न्याय आणि सर्वांसाठी सन्मान, याविषयीची त्यांची बांधिलकी होती त्यांच्या प्रत्येक लिखाणात या गोष्टी प्रतिपादित होतात. बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या बाबी अद्यापही पूर्ण झाल्या नाहीत. त्यांच्या या अपूर्ण स्वप्नांचा वारसा आज आपल्यापुढे एक आव्हान म्हणून उभा ठाकला आहे. काळाच्या ओघात नेमके स्वरुप आणि संदर्भ बदलले असावेत पण त्याच्या कायदेशीर आणि सामाजिक-राजकीय वारशाची मूळ मूल्ये आजच्या युगातही तितकीच प्रासंगिक असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.
महात्मा जोतिराव फुले यांनी सर्व समाजासाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बाबसाहेबांनी सर्व दीन दलितांना, वंचित शोषित वर्गातील जनतेला शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांच्यासाठी महाराष्ट्रात विविध भागात शैक्षणिक संस्थांची सुरुवात केली. त्यांच्या या उपक्रमाचे चांगले परिणाम आजही तितकेच महत्तवपूर्ण झाले आहेत. शिक्षणामुळे जागृती घडून येते. जाती-जातीत विभागलेली येथील समाजरचना एकसमान तत्त्वात आणण्यासाठी शिक्षणाची गरज महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून, समाजात बंधुत्वाची भावना वाढीस लागण्यासही मदत होत असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.
दलित जनतेला मिळालेला मुख्य वारसा हा त्यांच्यात स्वाभिमान आणि मानवी सन्मानाची भावना जागृत करणे हा होय. आपल्या न्याय, हक्कासाठी लढण्याचा दिलेला हा वारसा पूर्णत्वास नेण्याची आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे डॉ. राऊत म्हणाले. प्रत्येक नागरिकाला त्याची जात, लिंग, धर्म किंवा वर्ग याचा विचार न करता आयुष्यातील परिपूर्णतेची हमी देणे हे सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे. बाबासाहेबांना अपेक्षित समाज आणि राष्ट्र निर्माण होईपर्यंत बाबासाहेबांच्या अनुयायांनी आणि या देशातील नागरिकांनी संघर्षाची आपली भूमिका पार पाडावी, असेही श्री. राऊत यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. नितीन राऊत यांच्याकडून अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.