प्रशासकीयब्रेकिंग न्युज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून अभिवादन

आठवडा विशेष टीम―

अमरावती, दि. १४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात लिहिलेल्या भारतीय संविधानामुळेच महिलांसह सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून इंग्लंडमधील महिलांनी अनेक आंदोलने, रक्तरंजित लढा पुकारला होता. आपल्या देशात असा कुठलाही लढा न पुकारता सर्वांना समान अधिकार संविधानाच्या माध्यमातून बहाल झाले आहे. आजच्या काळात देशाला एकसंध ठेवण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांनी अंगीकारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज इर्विन चौक स्थित डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे विदर्भ संघटक चरणदास इंगोले, ॲड पी.एस खडसे,आंबेडकर संघर्ष समिती चे अध्यक्ष समाधान वानखडे, माजी नगरसेवक रामभाऊ पाटील, साची फाउंडेशन चे अध्यक्ष प्रा.जगदीश गोवर्धन, प्रा.सतीश सियाले, प्रवीण मनोहर आदी उपस्थित होते. डॉ. आंबडेकर यांच्या जयंतीनिमित्त श्रीमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, आज आपल्या देशातील महिलांना मतदानाचा अधिकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या संविधानामुळे महिलांना अधिकार मिळाले आहे. पण पूर्वी असे नव्हते. सर्वात आधी सन 1865 साली इंग्लंडच्या महिलांनी मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून लढा पुकारला होता. त्याठिकाणी त्या काळात महिलांनी अगदी आक्रमकपणे लढा दिला होता. त्यांना सुध्दा एकदम मतदानाचा अधिकार मिळाला नाही. त्यासाठी त्यांनी खूप आंदोलने केलीत. पुन्हा एकदा सन 1905 मध्ये तेथील महिलांनी संसद भवनावर आक्रमण केले त्या आंदोलनात कित्येक महिलांना प्राण गमवावे लागले. त्यांनी खूप सारे वारही झेलले, तरी व्यवस्थेला न घाबरता त्यांनी मतदानाच्याअधिकारासाठी लढा सुरुच ठेवला. शेवटी 1928 मध्ये महिलांना खऱ्या अर्थाने मतदानाचा अधिकार मिळाला.

आपण खूप नशीबवान आहोत, भारतात संविधानाची रचना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात झाली. आपल्याला कुठलाही लढा उभारावा लागला नाही. मतदानाचा अधिकार मिळाला. आज महिला स्वबळावर सर्वच कार्यक्षेत्रात कामगिरी बजावत आहेत. सरपंच, मंत्री ते देशाचे सर्वोच्च राष्ट्रपती पदही महिलांना मिळाले आहे, हे सर्व घडले ते डॉ. आंबेडकर या महामानवामुळे. त्यांनी रचना केलेल्या संविधानामुळे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांचे कोटी कोटी नमन करुन त्यांना विनम्र अभिवादन करते, त्यांचे मनःपूर्वक आभार मानते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांचा अखंडपणे पुरस्कार केला. शोषित, वंचित घटकांना न्याय मिळवून देत त्यांनी समाजाच्या व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले आयुष्य वाहिले. कष्टकरी, कामगारांचे हक्क, महिलांचे सक्षमीकरण, शिक्षण, कृषी-सिंचन अशा कितीतरी क्षेत्रात त्यांचे अतुलनीय कार्य आहे. आजच्या काळात देशाला एकसंध ठेवण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारणे आवश्यक आहे, असेही श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

यानंतर पालकमंत्र्यांनी अमरावती व तिवसा क्राँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराला सदिच्छा भेट दिली.

000

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button