आठवडा विशेष टीम―
अकोला,दि.१४ (जिमाका) – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने आज रात्रीपासून पंधरा दिवस राज्यात संचारबंदी घोषित केली आहे. या संचार बंदी च्या काळात नागरिकांनी घरातच राहावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.
आज जिल्हाधिकारी दालनात कोविड-१९ संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार ,मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आस्वले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारीडॉ. निलेश अपार ,तहसीलदार विजय लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोविड-१९ च्या संदर्भात आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले की, कोविड रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सेवेची अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी जिल्हा व आरोग्य प्रशासनाने घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले. ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी हवेतून ऑक्सीजन घेण्याबाबतचा प्लांट लवकरच सुरू करण्यात येणार असून या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन, रेडमीसिविर इंजेक्शन तसेच बेड ची कमतरता पडणार नाही, याकडे सतत लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ५० खाटांचे आयसीयु युनिट तयार करण्याबाबत सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्यात.
जिल्ह्यात कोणी उपाशी राहू नये यासाठी शासनामार्फत शिवभोजन थाली मोफत मिळणार आहे. अत्यंत गरीब व ज्यांना जेवणाची व्यवस्था नाही अशा गरजूंसाठी शिवभोजन थाली मोफत मिळणार आहे. यासाठी गरजुंची नोंद करावी, असे आवाहन त्यांनी केले. शिवभोजन थाली व प्राधान्य गटांना देण्यात येणारे मोफत अन्नधान्य याबाबत नियोजन करावे व याचा गैरवापर होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.
000