प्रशासकीयब्रेकिंग न्युज

आंभोरा पर्यटन स्थळासाठी निधीची कमतरता पडणार नाही

आठवडा विशेष टीम― नागपूर, दि. 23 : कुही तालुक्यातील आंभोरा तीर्थक्षेत्र या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. पालकमंत्र्यांनी आज या क्षेत्राच्या विकासकामांबाबतच्या सादरीकरणाचा आढावा घेऊन त्याबाबत सूचना केल्या. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 32 कोटी खर्चाच्या पर्यटन विकास आराखड्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात येईल, असे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस आमदार राजु पारवे, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर आदींसह विविध संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    आंभोरा तिर्थक्षेत्रात शिव मंदिर, बुध्द विहार व छोटा दर्गा असे भाग असून याचे चार झोन मध्ये विभागणी करण्यात येईल. या क्षेत्रात पाच नद्यांचा संगम होत असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे येणार आहेत. भाविकांसाठी यात्री निवासाची व्यवस्था करण्यात येईल. पर्यटनासाठी हाऊस बोटींग व वॉटर बोटींगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच वृध्दांसाठी लिफ्टची व्यवस्था राहील. वैनगंगा नदीत बुध्दाची मुर्ती, शिवपिंड व त्रिशूल नव्याने निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. केज फिशींग व सोलर सिस्टींमसह मुलांसाठी चिल्ड्रेन पार्क तयार करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

    पर्यटन विकास आराखड्यानुसार या प्रकल्पात सध्या दुपदरी रस्ता असणार असून नंतर त्यास चौपदरी करण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करुन तसा अहवाल सादर करावा. या प्रकल्पास भंडारा जिल्हा लागून असल्याने तेथून मार्ग जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटन विकास बरोबरच रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच शासनास महसूल मिळेल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.