आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. १५ : चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड-१९ संबधीचे दि १ एप्रिल पूर्वीची देयके एकत्रित करुन विभागीय आयुक्ताकडे तातडीने सादर करावी, असे निर्देश, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिले.
चंद्रपूर महानगर पालिकेला कोविड -१९ साठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निधी उपलब्ध करुन देण्याबाबत श्री. वड्डेटीवार यांच्य अध्यक्षतेखाली बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मदत व पुर्नवसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर, सहसचिव राजश्री राऊत उपस्थित होते. तसेच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
श्री. वड्डेटीवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड-19 च्या देयका संबंधीचा (मेडिसीनचा खर्च वगळून) परिपूर्ण असा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात यावा. तसेच दि. 31 मार्च 2021 च्या अगोदरची प्रलंबित असलेली सर्व देयके त्वरित सादर करावीत. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड-19 साठी 24 कोटी मंजूर करण्यात आले होते. कोविड-19 च्या संबंधीचा मेडिसीन,ॲक्सिजन,मनुष्यबळ तसेच या संबधीची लागणारी आवश्यक साधनसामुग्री यासंबंधीचा परिपूर्ण अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश श्री. वड्डेटीवार यांनी जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना दिले.
कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यातही जंबो कोविड सेंटर उभारण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी सूचना श्री. वड्डेटीवार यांनी केली.
000