प्रशासकीयब्रेकिंग न्युज

फेरनोंदणी न झालेल्या साडेचार लाख घरेलू कामगारांनाही मिळणार मदत

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. १५ : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर राज्य शासनाने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी जाहीर केलेली मदत कामगारांपर्यंत तातडीने पोहोचविण्यात यावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले. राज्य शासन येत्या काळात कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सोशल ऑडिट करण्यास सकारात्मक आहे याबाबत समाधानही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

बांधकाम आणि घरेलु कामगार यांना कोविड कालावधीत शासकीय मदत मिळण्याबाबतचे नियोजन यासंदर्भातील बैठक आज विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कामगार मंत्री हसन मुश्रीफ, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद- सिंघल, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, पुण्याचे अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, पुणे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. यावेळी क्रेडाईचे उपाध्यक्ष श्री. इनामदार, सपना राठी यांच्याबरोबर स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी शैलजा आरळकर, मेघा थत्ते यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया यावर भर देण्यात येईल जेणेकरुन नोंदित कामगारांना राज्य शासनाच्या योजनांचा फायदा आणि अर्थसहाय्य देता येते. याशिवाय सेाशल ऑडिट करणे, विविध योजना कार्यान्वित करणे, राज्य शासनाने जाहीर केलेली मदत अधिकाधिक कामगारांपर्यंत पोचेल असे निकष सुचविण्यात आले .

लॉकडाऊनमध्ये कामगारांना तसेच मजुरांना पोट भरण्यासाठी अन्नछत्र उभारण्याची मागणी होत होती. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व इतर मंत्रिमंडळातील सदस्यांनी नागरिकांना ‘शिवभोजन’ च्या मार्फत ‘मोफत थाळी’ देण्याचा निर्णय घेतला आहे याबद्दल डॉ.गोऱ्हे यांनी शासनाचे आभार मानले आहेत.

पुणे जिल्हापरिषद यांनी ज्या नागरिकांकडे रेशनकार्ड नाहीत अशा कुटुंबांना सीएसआर च्या माध्यमातून रेशन उपलब्ध करून देण्याबाबत योजना आखली होती. सदरील योजना संपूर्ण राज्यात राबविण्याकरिता राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे ना.डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

अधिकाधिक कामगार नोंदणी करण्यावर भर देणार – कामगार मंत्री हसन मुश्रीफ

आज असंघटित क्षेत्रात अनेक कामगार काम करीत असून या कामगारांचे नोंदणीकरण वेळेत करणे यावर येत्या काळात भर देण्यात येईल. सध्या ऑनलाईन पध्दतीने कामगारांचे नोंदणीकरण करण्यात येत असून येत्या काळात कामगारांची नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी करण्यावर भर देण्यात येईल, असे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे 12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल अशी घोषणा केली असून या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी कामगार विभाग काम करीत आहे. याशिवाय राज्यातील लाखो घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. काही वर्षापूर्वी जवळपास 4.50 लाख घरेलू बांधकाम कामगारांची नोंदणी केली होती. मात्र या घरेलू कामगारांनी आपली पुर्ननोंदणी जरी केली नसली तरी या सर्वांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी कामगार विभाग काम करेल, असेही मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले.

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामगार विभाग व मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्याकडे सरकारच्या विविध निर्णयांबाबत पाठपुरावा करणार असून जनतेपर्यंत माहिती पोचवून गोरगरीबांना आधार मिळावा यासाठी सर्व आमदार खासदारांनी मोहिम घेऊन सर्व जिल्ह्यात पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button