प्रशासकीयब्रेकिंग न्युज

मुंबई महानगरातील मान्सूनपूर्व तयारीची कामे वेळेत पूर्ण करा  – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 16 : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी मान्सूनपूर्व कामांवर त्याचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी आणि नालेसफाईसह साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच नियोजनानुसार सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांचा आढावा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ऑनलाईन बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए.राजीव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलारासू, सुरेश काकाणी आदी सहभागी झाले होते.

या बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले की, मुंबईतील नालेसफाई करतानाच आवश्यक त्या ठिकाणी नाले खोलीकरण अथवा रुंदीकरण करुन त्यांची नैसर्गिक प्रवाह क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे पावसाळी पाण्याचा निचरा वेगाने होऊ शकेल. तसेच महामार्ग आणि पदपथाच्या बाजूला टाकण्यात आलेले डेब्रिज उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी डेब्रिज टाकणाऱ्यांना सूचना द्यावी. चुकीच्या पद्धतीने डेब्रिज टाकणाऱ्यांना ताकीद देण्यात यावी. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर मलेरिया, डेंगीची शक्यता वाढते. त्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. ही सर्व मान्सूनपूर्व तयारीची कामे नियोजनानुसार ३१ मे पूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत सुरु असलेल्या कोस्टल रोड, मेट्रो अशा कामांच्या परिसरात साचत असलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेने संबधित यंत्रणांशी समन्वय साधून उपाययोजना करावी, अशी सूचना केली.

मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. चहल म्हणाले की, मुंबईमध्ये २०२० मध्ये सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत तब्बल ६४ टक्के अधिक पाऊस नोंदवला गेला. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार, पावसाळापूर्व नालेसफाई व गाळ काढण्याच्या कामांची सुरुवात ऑक्टोबर २०२० मध्येच करण्यात आली. परिणामी प्रशासकीय कार्यवाही व निविदा आदी प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामे लवकर सुरु झाली. तसेच मुंबईत पावसाचे पाणी साठण्याची संभाव्य अशी ४०६ ठिकाणे शोधून तेथील आवश्यक कामे सुरु करण्यात आली आहेत. मुंबईतील ३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या व राहण्यास धोकादायक असलेल्या इमारतींना नोटिसा देणे, धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे आदी कामांना प्रारंभ करण्यात आल्याचेही श्री. चहल यांनी सांगितले.

मान्सूनपूर्व कामांची सविस्तर माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सादरीकरणातून दिली. यात मागील वर्षी मुंबईत नदी-नाल्यांमधून एकूण ५ लाख ०४ हजार १२५ मेट्रिक टन गाळ काढण्यात आला होता. यंदा त्यामध्ये सुमारे ३५ टक्के वाढ करुन ६ लाख ८५ हजार ३५८ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्टापैकी आजमितीपर्यंत १ लाख ८३ हजार ७१६ मेट्रिक टन म्हणजे सुमारे ३५ टक्के गाळ काढण्यात आला आहे. दरवर्षी हिंदमाता आणि गांधी मार्केट या सखल भागांमध्ये हमखास पाणी साचते. तेथील पाण्याचा निचरा आता पूर्वीपेक्षा वेगाने होतो. असे असले तरी या दोन्ही ठिकाणी पाणी साठवणाऱ्या भूमिगत स्वरुपाच्या मोठ्या टाक्या बांधण्यात येत आहेत. सखल भागात पावसाचे पाणी भरु लागले तर ते या टाक्यांमध्ये सोडण्यात येईल. भरती ओसरल्यानंतर हे पाणी समुद्रात सोडण्यात येईल. यामुळे पाणी साचणार नाही, असे श्री. वेलरासू यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे मुंबईतील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी यंदा ४७० पंप भाडे तत्त्वावर घेण्यात येणार आहेत. रेल्वेसह इतर यंत्रणांनीही आपापल्या हद्दीत आतापर्यंत चांगल्या रीतीने नालेसफाई व स्वच्छतेची कामे केल्याचे दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या सर्व अभियांत्रिकी विभागांनी प्रगतीपथावर असलेली कामे सुरक्षित व सुस्थितीत राहतील, अशा रीतीने कामांचा वेग वाढविल्याचेही श्री. वेलरासू यांनी सांगितले.

महानगरपालिकेचे कीटक नियंत्रण अधिकारी श्री. राजन नारिंग्रेकर यांनी देखील डास प्रतिबंधक, मूषक निर्मूलन व तत्सम उपाययोजनांची सद्यस्थिती यावेळी सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button